मच्छीमारांनी रोखले कोस्टल रोडचे काम, वरळी कोळीवाड्याचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:09 AM2018-12-26T05:09:36+5:302018-12-26T05:10:53+5:30

महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेनेने वाजगाजत केले खरे.

 Fishermen stopped the work of Coastal road, Worli to Koliwada | मच्छीमारांनी रोखले कोस्टल रोडचे काम, वरळी कोळीवाड्याचा विरोध

मच्छीमारांनी रोखले कोस्टल रोडचे काम, वरळी कोळीवाड्याचा विरोध

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेनेने वाजगाजत केले खरे. मात्र, कोळी बांधवांच्या असहकारामुळे समुद्रात बोटी टाकून सर्वेक्षण करणे, महापालिका अधिकारी व ठेकेदारांच्या कामगारांना जड जात आहे. वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांचा विरोध कायम असल्याने, गेले दोन आठवडे या प्रकल्पाचे काम ठप्प पडले आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १६ डिसेंबर रोजी केले. मच्छीमार संघटनांबरोबर दोन दिवसांत चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. प्रत्यक्षात मच्छीमारांचे प्रश्न जैसे थेच आहेत.
या प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या दोन खांबांमध्ये दोनशे मीटर अंतर ठेवल्यास मच्छीमारांच्या बोटी ये-जा करू शकतील. पूर्वनियोजित ठिकाणी खांब उभे केल्यास, त्या ठिकाणी असलेल्या माशांच्या पैदाशीच्या महत्त्वाच्या स्थळावर परिणाम होण्याची भीती, वरळी कोळीवाड्यातील विजय पाटील यांनी व्यक्त केले.

शिवसेनेकडून आश्वासन
दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुलाबाई देसाई रोडवरील अमर सन्स उद्यान येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्यानंतर, पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन कोळी बांधवांना दिले होते.
यासाठी हवे खांबांमध्ये अंतर
महापालिकेच्या आराखड्यानुसार दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे. मात्र, हे अंतर १२० मीटरहून अधिक असावे, अशी मच्छीमार संघटनांची मागणी आहे. दोन खांबांमधील अंतर केवळ ६० मीटर असेल, तर हवेचा वेग अधिक असल्यास, तसेच समुद्रात भरती, आहोटी असल्यास मासेमारीत अडचण येऊन बोट या खांबांवर धडकण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे.

कोळीवाड्यात पाणी शिरण्याची भीती

या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे. मात्र, यामुळे पालघर येथील सातपाटी गावाप्रमाणे वरळी कोळीवाड्यातही पावसाळ्यात समुद्राचे पाणी शिरण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली.

नरिमन पॉइंट ते कांदिवली -
२९.२ किमी सागरी मार्ग
पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंकपर्यंत या ९.९८ किमीचे काम २0१९ पर्यंत करण्यात येणार आहे.
त्यानंतर, वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसºया टप्प्याचे काम करण्यात येणार आहे.
किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचे बांधकाम करून कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे.
या कोस्टल रोडसाठी १२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title:  Fishermen stopped the work of Coastal road, Worli to Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई