जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ कासवांची मढ येथील मच्छिमारांनी दिले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 10:18 PM2018-07-02T22:18:20+5:302018-07-02T22:21:04+5:30
मढ कोळीवाड्यात हरबादेवी स्पोटर्स क्लबच्या मच्छिमारांनी दोन कासवांची सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मढ कोळीवाड्यात हरबादेवी स्पोटर्स क्लबचे मच्छिमार आज सायंकाळी बंदरावर फुटबॉल खेळत असताना चंद्रकांत कोळी यांना टाकाऊ जाळ्यात दोन कासव अडकलेली दिसली. त्यांनी भर समुद्रात जाऊन आेढत कासवाना जाळ्यासह किना-यावर सुखरूप आणले. किना-यावर विजय कोळी,अक्षर भोईर, रोशन भगत अन्य मच्छिमारांच्या सहकार्याने दोन कासवांची सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडले अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचें सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.
गेल्या 20 वर्षांनंतर येथील वर्सोवा, सातबंगला समुद्र किनारी गेल्या 22 मार्चला ऑलिव्ह रिडली 80 समुद्र कासव सापडली होती.
पावसाळ्यात मासेमारी बंद असते.यावेळी कासवे अंडी घालतात.त्यामुळे ही कासवे येथील समुद्र किनारी आली असतील अशी माहिती किरण कोळी यांनी दिली. गेली अनेक वर्षे येथून गायब झालेले दुर्मिळ रिडली समुद्र कासव आपल्याला पाहायला मिळाली याचा खूप आनंद मढवासियांना झाला आहे.
अश्या प्रकारच्या जलचर प्राण्यांचे जतन करण्यासाठी येथे बीचवर एक मारिन कन्झरवेशन सेंटर येथे उभारले जावे अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे करणार असल्याची माहिती शेवटी किरण कोळी यांनी दिली.