मच्छिमारांना येणार 'अच्छे दिन', किसान क्रेडिट कार्ड योजना ठरणार आधारवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 09:30 PM2019-07-28T21:30:14+5:302019-07-28T21:31:19+5:30
किसान क्रेडिट कार्ड योजनेत पिकांसाठी लागणारे खेळते भांडवल कर्ज रुपाने शेतकऱ्यांना दिले जाते.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - देशातील तमाम मच्छिमारांसाठी आता अच्छे दिन आता येणार असून किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा नुकतीच रिझर्व्ह बँकेने केली आहे. पूर्वी केंद्र सरकारच्या कृषी खात्यात मत्स्यव्यवसाय खाते समाविष्ट होते. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दुष्काळजन्य व अन्य फायदे मिळत असतांना मात्र या फायद्याचा लाभ होत नव्हता. त्यामुळे मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय करण्याची आग्रही मागणी नँशनल फिशवर्क्स फोरम (एनएफएफ) आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने गेली अनेक वर्षे केंद्र व राज्य सरकारकडे केली होती. या संस्थेच्या मागणीला यश येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 24 फेब्रुवारी रोजी गोरखपूर येथे वरिल संघटनेच्या मागणी अनुसार केलेल्या घोषणे नुसार लोकसभा निवडणूक 2019 नंतर मच्छिमारांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले.
स्वतंत्र्याच्या 72 वर्षानंतर देशातील तमाम मच्छिमारांना वरिल महत्वपूर्ण दिलासा दिल्याबद्दल नँशनल फिशवर्क्स फोरम (एनएफएफ) आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत. आता, सदर घोषणे नुसार किसान क्रेडिट कार्ड देण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे आता मच्छिमारांसाठी अच्छे दिन येतील असा ठाम विश्वास महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाखाची पिक कर्ज देण्याची किसान क्रेडिट कार्ड योजना सागरी मच्छिमारांना केंद्र शासनाने लागू केली आहे. या निर्णयामुळे मासेमारी व्यवसायाला कृषी दर्जा देण्याच्या मच्छिमारांच्या मागणीला यश मिळाले असे मत नँशनल फिश वर्क्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
किसान क्रेडिट कार्ड योजनेत पिकांसाठी लागणारे खेळते भांडवल कर्ज रुपाने शेतकऱ्यांना दिले जाते. हे कर्ज पाच वर्षाच्या कालावधीत परत करावयाचे असते. त्यावरील व्याज दराला शासकिय अनुदान मिळून केवळ 4% इतक्या अल्पदरात कर्ज उपलब्ध असते. देशातील सर्व बँकाना हे कृषी कर्जच्या स्वरुपात देणे बंधन कारक असते. दुष्काळ पडल्यास हे कर्ज फेडीसाठी शासनाकडून मुदतवाढ वा कर्ज माफी मिळत असते. या योजने अंर्तगत मिळणाऱ्या कर्जाची रक्कम खरिफ व रब्बी पिकांना लागणारे बी, बियाणे, खते किटकशाके, इत्यादीसाठी उपलब्ध असते. डीएलसीसी म्हणजे जिल्हास्तरीय ऋण समिती या पिक कर्जाची रक्कम म्हणजे स्केल ऑफ फाईनांस ठरवित असते, अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो व कार्याध्यक्ष रामकृष्ण केणी यांनी दिली.
मच्छिमारांसाठी लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे सर्व प्रथम मासेमारीसाठी लागणाऱ्या खर्चाचे निर्धारण होणे आवश्यक आहे. खाऱ्या पाण्यातील मासेमारी, गोड्या पाण्यातील मासेमारी, मत्सशेती , इत्यादी विविध प्रकारच्या मासेमारी साठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची आवश्यक रक्कम स्केल ऑफ फायनासं यांनी निश्चित केली आहे. याप्रकारे स्केल ऑफ फायनान्स डीएलसीसी ही शासकिय संस्था निश्चित करेलच. मात्र, यासाठी मच्छिमारांच्या संस्थानी विविध प्रकारच्या मासेमारी साठी लागणारा किमान खर्चाबाबत डीएलसीसीला निवेदने दिल्यास मिळणारे कर्ज मासेमारीसाठी पुरक ठरु शकेल, असा विश्वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
या योजनेत पिक कर्जातील महत्वाचा मुद्दा पिकविमा आणि शेती दुष्काळ हा आहे. मच्छिमारांना योजना लागू करत असताना मत्स्यविमा आणि मत्स्यदुष्काळ या दोन महत्वाच्या घटकांचा विचार झाला पाहिजे. मस्त्य उत्पादनांचा विमा आणि मत्स्य दुष्काळाचे निकष निश्चित झाल्यास किसान क्रेडिट कार्ड देशातील तमाम मच्छिमारांसाठी उपयुक्त आणि विकासाला सहाय्यभूत ठरेल, असे ठाम मत किरण कोळी यांनी शेवटी व्यक्त केले.