लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मच्छीमारांना लवकरच डिझेलवरील परतावा वितरित केला जाईल. २०२०-२१ या आर्थिक वर्षात डिझेल परताव्याची ६० कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यातील १९.३५ कोटी इतकी रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरित करण्यात आली होती. डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून विभागाला वितरित करण्याची मागणी मान्य करत अर्थमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीचे आदेश विभागाला दिल्याचे राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
यंदाच्या आर्थिक वर्षात तरतूद केल्याप्रमाणे डिझेल परताव्यासाठीच्या ६० कोटींच्या निधीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी लवकरात लवकर वित्त विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागास वितरित करण्याची मागणी अस्लम शेख यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीला अर्थमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भाजप सरकारच्या काळात डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत गेल्याचे सांगतानाच हा अनुशेष भरून काढत आतापर्यंत ११० कोटींपर्यंत डिझेल परतावा मच्छीमारांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
डिझेल परताव्यासाठी १८९ कोटींची पूरक मागणी करण्यात आली असून, या मागणीलाही अर्थमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या ९,६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले.
................................