Join us

२५ ऑगस्टला मासळी मार्केटच्या मुद्द्यावरून मच्छीमार धडकणार पालिका मुख्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:07 AM

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेकडून भूमिपुत्र मच्छीमारांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या दि. २५ रोजी मासळी मार्केटच्या मुद्द्यावरून मच्छीमार बांधव ...

मुंबई :- मुंबई महानगरपालिकेकडून भूमिपुत्र मच्छीमारांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या दि. २५ रोजी मासळी मार्केटच्या मुद्द्यावरून मच्छीमार बांधव व कोळी महिला या मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडक देणार आहेत, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.

आंदोलन प्रखर करण्यासाठी मच्छीमारांनी कंबर कसली असून, मुंबई, उत्तन, वसई, पालघर, रायगड, ऐरोली आणि मुंबईतील १०८ मासळी मंडईतील महिला या मच्छीमार मोर्चात सहभागी होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी म्हटले.

अगोदर क्रॉफ्रड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईवर पालिकेकडून कुऱ्हाड मारण्यात आली आणि नंतर दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईमधील कोळी मासे विक्रेत्या महिलांना कसलीच पूर्वकल्पना न देता जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेच्या अशा अघोरी कृत्यामुळे मच्छीमार समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मच्छीमारांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते; परंतु कुठल्याच राजकीय पक्षाने दखल न घेतल्याने मच्छीमारांनी अखेर आंदोलनाची भूमिका स्वीकारल्याचे समितीचे महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी सांगितले.

क्रॉफ्रड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईतील मासळी व्यावसायिकांना पर्यायी जागा ही क्रॉफ्रड मार्केटच्या परिसरात देण्यात यावी तसेच पालिकेने २०१७ ला उठवलेले आरक्षण पुनर्स्थापित करून कायमस्वरूपी या मुद्द्याला पूर्णविराम देण्याची मागणी देवेंद्र तांडेल यांनी केली.

दादर येथील मासळी मंडई स्वच्छतेच्या मुद्द्यावरून जमीनदोस्त करण्यात आली होती, अशी माहिती दावा तांडेल यांनी दिली.

वेंगुर्ला आणि पणजी येथील मासळी मंडईचा आदर्श घेऊन पालिकेने दादर येथे सुसज्ज मासळी मंडई निर्माण करून मच्छीमारांना आपले हक्काचे उदरनिर्वाह करण्यास सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जर पालिकेने मच्छीमारांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर दि. २५ ऑगस्टचे आंदोलन पुढे उग्र रूप घेणार असा इशारा समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी दिला.