मच्छीमारांचे राजभवनावर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:23 PM2022-04-19T12:23:18+5:302022-04-19T12:23:49+5:30

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मच्छीमारांना पेट्रोल पंपावरील रिटेलच्या तुलनेत २५ रुपयांनी महाग डिझेल खरेदी करावी लागत आहे. आधीच वाढत्या इंधन दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

Fishermen's agitation at Raj Bhavan | मच्छीमारांचे राजभवनावर आंदोलन

मच्छीमारांचे राजभवनावर आंदोलन

Next

मुंबई : मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत मुंबई प्रदेश मच्छीमार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यानंतर मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले.
मच्छीमारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात मच्छीमार काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश मच्छीमार काँग्रेसने सोमवारी ‘ चलो राजभवन ’ चा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर राजभवन बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकर्त्यांच्या धरणे आंदोलनानंतर राज्यपालांनी अस्लम शेख आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण दिले.

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मच्छीमारांना पेट्रोल पंपावरील रिटेलच्या तुलनेत २५ रुपयांनी महाग डिझेल खरेदी करावी लागत आहे. आधीच वाढत्या इंधन दरांमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच मच्छीमारांच्या वर्गीकरणात बदल करण्यात आल्याने डिझेलसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे योग्य वर्गीकरण करण्याची मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. तर, सीआरझेड कायद्यातील बदलामुळे संपूर्ण कोळीवाडेच नष्ट होऊन त्याजागी काँक्रीटचे जंगल तयार होईल आणि मच्छीमार हद्दपार होऊन जातील, अशी भीती भाई जगताप यांनी व्यक्त केली. यावेळी धनाजी कोळी, संतोष कोळी, रवींद्र पांचाळ, मार्तंड नाखवा, जयेंद्र झेमणे, कृष्णा पावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Fishermen's agitation at Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.