मुंबई- मासेमारीत केरळनंतर वेसावे कोळीवाड्याचा नंबर लागतो. येथे सुमारे 350 यांत्रिकी नौका असून येथील मच्छिमारांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी येथील भाजपाच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी काल सायंकाळी वेसाव्यातील विविध मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांची महत्वाची संयुक्त बैठक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुमंत भांगे यांच्या बरोबर त्यांच्या चर्नी रोड येथील कार्यालयात आयोजित केली होती.
या बैठकीत आमदार डॉ. लव्हेकर यांनी सांगितले की, 2014 मध्ये येथून आमदार म्हणून निवडून आल्यापासून येथील मच्छिमारांच्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे व विधानसभेत देखील विविध आयुधांच्या माध्यमातून पोटतिडकीने मांडले होते.मात्र येथील वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व वेसावा कोळी सहकारी सर्वोदय सोसायटी लिमिटेड या दोन मच्छिमार सहकारी संस्थांचा गेल्या 20 महिन्यांचा मिळून 15 कोटी 60 लाख रुपये प्रतिपूर्ती परतावा अर्थसंकल्पात तरतूद करून मिळालेला नाही.त्यामुळे वेसावकर हवालदिल झाले आहेत.डिझेल व मासेमारी साधनांचे भाव वाढल्याने मासेमारी करणे येथील मच्छिमारांना मुश्किल झाले आहे. त्यामुळे लवकर येथील सदर परताव्याची रक्कम या दोन संस्थांना वितरित करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
वेसावे खाडीमध्ये जवळजवळ 55 लाख क्युबिक मीटर एवढा गाळ आहे त्यापैकी मध्यंतरी मख्यमंत्र्यांनी चार कोटी एक लाख रुपये मंजूर केल्यामुळे एक लाख एकतीस हजार क्युबिक मीटर एवढा गाळ काढण्यात आला होता, उर्वरित गाळ काढण्यासाठी जास्तीत जास्त शासनाने निधी मंजूर करावा अशी मागणीही यावेळी बैठकीत करण्यात आली. त्यादृष्टीने 38 कोटी चा प्रस्ताव मेरिटाइम बोर्डाने सागर माले अंतर्गत केंद्राकडे पाठवला आहे अशी माहिती आमदार लव्हेकर यांनी दिली. यावेळी प्रखर दिव्याने खोल समुदात एलईडीच्या साहाय्याने मासेमारी करण्यात येते,यावर आळा घालावा अशी मागणी यावेळी आमदार लव्हेकर उपस्थित मच्छिमार सहकारी सोसायट्यांनी केली.
मासेमारी हंगाम हा 1 ऑगस्ट ते 31 मे पर्यंत असतो आणि पावसाळ्यात मासेमारी 1 जून ते 31 जुलै या काळात बंद असते. मत्स्य उत्पादन वाढावे या उद्देशाने हा कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत वाढवण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार डॉ.लव्हेकर यांनी केली. गेली तीन वर्षे मत्स्य उत्पादन कमी झाल्याने मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागते.त्यामुळे जशी शेतकऱ्यांना दुष्काळी मदत केली जाते त्याप्रमाणे सागराशी मुकाबला करणाऱ्या मच्छिमारांसाठी शासनाने मासळी दुष्काळ जाहिर करून त्यांना अर्थसहाय्य द्यावे अशी आग्रही मागणी आमदार लव्हेकर यांनी केली.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत आमदार लव्हेकर व येथील मच्छिमार संस्थांचे म्हणणे मत्स्यव्यवसाय आयुक्त सुमंत भांगे यांनी ऐकून घेतले.यानंतर त्यांनी येथील दोन मच्छिमार सहकारी सोसायट्यांचा डिझेल परतावा प्राधान्याने लवकर देण्यात येईल,एलईडी मासेमारीवर शासन कडक कारवाई करेल तसेच वेसावे खाडीतील गाळ लवकर काढण्यासाठी नवे टेंडर काढण्यात येऊन साचलेला गाळ काढण्यासाठी नवीन ड्रेजर घेण्यात येणार असून तो वेसावे समुदात कायमस्वरूपी तैनात करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले.
प्रथमच अश्या प्रकारची बैठक मत्स्यव्यवसाय आयुक्तांबरोबर आयोजित केल्यामुळे आणि आता येथील मच्छिमारांचे प्रश्न आमदार लव्हेकर यांच्यामुळे लवकर मार्गी लागणार असल्याने वेसावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बैठकीला आमदार डाॅ भारती लव्हेकर,साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त राजेंद्र जाधव,साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त युवराज चौगुले,मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त संदीप दप्तरदार, मेरी टाईम बोर्डचे अधिकारी खरे तसेच नेव्ही व कोस्टगार्ड चे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपा चे प्रभाग क्रमांक 60 चे नगरसेवक योगिराज दाभाडकर,प्रभाग क्रमांक 63 च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील,वर्सोवा भाजपा अध्यक्ष पंकज भावे, वेसावा कोळी मच्छिमार नाखवा मंडळ (ट्राॅलर) अध्यक्ष देवेंद्र काळे. उपाध्यक्ष पराग भावे, वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी. अध्यक्ष नारायण कोळी, वेसावा कोळी सहकारी सर्वेदय सोसायटी लिमिटेड, अध्यक्ष चंदन पाटील, वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी, अध्यक्ष संदीप भानजी आणि येथील मच्छिमार बांधव व कोळी महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.