मच्छीमारांचा मोर्चा फसला !
By admin | Published: February 28, 2015 11:10 PM2015-02-28T23:10:26+5:302015-02-28T23:10:26+5:30
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले.
हितेन नाईक ल्ल पालघर
समुद्रात ओएनजीसीच्यावतीने सुरु असलेल्या सर्वेक्षणामुळे नष्ट होणाऱ्या मत्स्यसंपदेच्या व मच्छिमारांना अटकाव केला जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या शनिवारच्या मोर्च्यामधून प्रमुख नेते व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले.
सध्या समुद्रात मच्छिमारांचा मासेमारी हंगाम असल्याने ओएनजीसीच्यावतीने सेसपीक जहाजामार्फत दोन ठिकाणावर सर्वेक्षण सुरू असल्यामुळे मुंबई ते झाई दरम्यानच्या मच्छिमारांना मासेमारी करण्यापासून परावृत्त केले जात असल्याने मच्छिमारांचे मोठे नुसान होत आहे. त्यामुळे काल पालघर या झालेल्या बैठकीत मुंबईत अर्नाळा भागातील बोटी मढगावासमोर तर दातिवरे ते झाई-बोर्डी दरम्यानच्या बोटी माहीम-वडराई समोरच्या समुद्रातील सर्वेक्षण ठिकाणी जाऊन काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचे ठरले होते.
आज निषेध मोर्च्यात सामील होण्यासाठी पालघर तालुक्यातून वडराई, टेंभी व केळवा भागातील सुमारे ६० लहान बोटींनी १२ वाव समुद्रात आपल्या बोटींना काळे झेंडे लावून निषेध नोंदविला. मात्र दातिवरे, एडवण, उसरणी, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेडी, दांडी इ. भागातून मच्छिमार बोटी या निषेध मोर्चात सहभागी न झाल्याने या मोर्चाचा फज्जा उडाल्याचे सांगतले जाते. या मोर्चात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विविध कारणे सांगून या मोर्च्यातून अंग काढून घेतल्याने त्यांच्या अनुपस्थिततीबाबत मच्छिमारांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. समुद्रात सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामासाठी काही मच्छिामारांनी आपल्या बोटीही भाड्याने दिल्याने नेते व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाबाबत मच्छिमारांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे. आ.एन.जीसीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्येच झालेल्या चर्चेत काही मच्छिमार नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमूळे हे सर्वेक्षण होणारच याची आम्हाला कल्पना आल्याचे एका पदाधिकाऱ्यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे मच्छिमारांच्या मुळावर आलेली जेएनडस्कची जेट्टी, अरवाना इन्फ्रास्ट्रक्चरची जेट्टी व ओएनजीसीचे सर्वेक्षण याबाबतच्या मच्छिमार नेते व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे मच्छिमार आता संशयाने पाहू लागले आहेत. आज झालेल्या मोर्चात राकृष्ण तांडेल, परशुराम धनू, हरेश्वर मेहेर, गणेश तांडेल इ. मच्छिमारांनी सहभाग घेऊन आपला निषेध नोंदविला.