Join us

समुद्रात आज मच्छीमारांचा मोर्चा

By admin | Published: February 27, 2015 11:02 PM

ओएनजीसीने ऐन हंगामात मासेमारी क्षेत्रातच सर्वेक्षण केल्याने मत्स्य पैदाशीचे गोल्डन बेल्ट समजले जाणारे क्षेत्र नष्ट होणार आहे.

पालघर : ओएनजीसीने ऐन हंगामात मासेमारी क्षेत्रातच सर्वेक्षण केल्याने मत्स्य पैदाशीचे गोल्डन बेल्ट समजले जाणारे क्षेत्र नष्ट होणार आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण पावसाळ्यात (मच्छिमारी बंदीच्या काळात) घ्यावे ही मागणी धुडकावून लावल्याने शनिवारी ओएनजीसीच्या विरोधात महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई ते झाईतील मच्छीमार आपल्या बोटीवर काळे झेंडे लावून ओएनजीसी विरोधात निषेध मोर्चा काढणार आहेत.ऐन मासेमारी हंगामातच ओएनजीसीतील म्हणजे जानेवारी २०१५ ते मे २०१५ या कालावधीत माशांचा गोल्डन बेल्ट समजला जाणाऱ्या (वडराईसमोर १९.३५/ ७२.२७, जीपीएस पॉईट व मढ समोर १९.१०/७२.२७ जीपीएस पॉर्इंट) भागात ओएनजीसीने सर्वेक्षण सुरू केले आहे. ते वेस्टर्न जिको या परदेशी कंपनीद्वारे करण्यात येत असून १७ डिसेंबर २०१४ रोजी म.म.कृ. समितीच्या वतीने हे सर्वेक्षण रद्द करण्यासंदर्भात ओएनजीसीला कळविण्यात आले होते. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने ७ जानेवारी रोजी मच्छीमारी बंद करून तर १६ जाने. रोजी ५०० बोटीनी समुद्रात काळे झेंडे दाखवून निदर्शन केली होती. परंतु तरीही सर्वेक्षण सुरूच राहिल्याने मच्छीमार समाज संतप्त झाला असून शनिवारी २८ फेब्रुवरी रोजी सकाळी १०.३० वा. मुंबईपासून ते थेट झाई दरम्यानच्या किनारपट्टीवरील सर्व गावातील मच्छीमार बोटी आपल्या बोटीवर काळे झेंडे दाखवून सर्वेक्षणाठिकाणी जाऊन सनदशीर मार्गाने आपला निषेध व्यक्त करावा असे, आज ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सभागृहातील बैठकीदरम्यान ठरविण्यात आले. म. म. कृ. स. चे कार्याध्यक्ष लिओ कोलॅसो, नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, राजन मेहेर, अशोक नाईक, नारायण विंदे, पोर्णिमा मेहेर, ज्योती मेहेर इ. सह पालघर जिल्ह्यातील ४० सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी आज एकत्र येऊन ओएनजीसी विरोधात तीव्र लढा उभारण्याचे जाहीर केले. त्याचे पहिले पाऊल म्हणून २८ फेब्रुवारी रोजी समुद्रात निषेध मोर्चा काढण्यात येणार असून २६ मार्च रोजी विधान भवनावर पालघर जिल्हा, रत्नागिरी, मुंबई जिल्ह्यापासून सर्व मच्छीमारांचा मोर्चा धडकणार असल्याचे कार्याध्यक्ष कोलॅसो यांनी सांगितले. (वार्ताहर)