Join us  

वेसाव्यात वाढवण बंदर विरोधात मच्छिमारांची निदर्शने; काळे झेंडे घेऊन, वाढवण बंदर विरोधात घोषणा

By मनोहर कुंभेजकर | Published: August 30, 2024 2:28 PM

वाढवण बंदरा साठी हजारो एकर भराव समुद्रात घालण्यात येणार आहे, व हजारो एकर क्षेत्रात मच्छिमारांन मासेमारी करता येणार नाही.

मुंबई-वाढवण बंदर निर्मिती साठी राज्यातील सागरी किनारपट्टीतील लाखो  मच्छिमारांचा विरोध असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनाशकारी वाढवण बंदर पायाभरणी कार्यक्रम हाती घेतला, त्याला विरोध दर्शवून, वाढवण बंदर रद्द करावे म्हणून वेसावा येथील मच्छिमार मोठ्या संख्येने, वेसावे बंदर किनारी जमा झाले. काळे झेंडे घेऊन, वाढवण बंदर विरोधात घोषणा देत मच्छिमारांनी आपला विरोध दर्शवीला.

वाढवण बंदरा साठी हजारो एकर  भराव समुद्रात घालण्यात येणार आहे, व हजारो एकर क्षेत्रात मच्छिमारांन मासेमारी करता येणार नाही.मच्छिमारांची अनेक गावे नष्ट होणार व मच्छिमार विस्थापित होणार आहे.केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन  संस्थेने सुद्धा वाढवण बंदर विरोध केला आहे.

 सरकारने मच्छिमारांच्या जीवनात ढवळाढवळ करू नये व वाढवण बंदर रद्द करावे अशी मागणी, वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष जयराज चंदी यांनी केली. तर वाढवण बंदरा मुळे संपूर्ण मच्छिमारी नष्ट होणार असून मच्छिमार देशोधडीला लागतील अशी भीती मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी व्यक्त केली. आजचा दिवस मच्छिमारांच्या आयुष्यात काळा दिवस म्हणून नोंद होईल असे सांगितले.

पालघर, ठाणे, मुंबई ते रत्नागिरी पर्यंतच्या सर्व मच्छिमारांचा वाढवण बंदरा करिता विरोध आहे व काही ठराविक उद्योजकांच्या फायद्यासाठी मच्छिमारांचा बळी दिला जात आहे अशी भावना मच्छिमार अभ्यासक पृथ्वीराज चंदी यांनी व्यक्त केली.

  वाढवण बंदर विरोध दर्शविण्याकरिता वेसावे येथील मच्छिमार पराग भावे, जयेंद्र लडगे, नारायण कोळी, रणजित काळे, सुरेश भावे, देवेंद्र काळे , सुरेश कालथे, हरेश भानजी, विशाल चंदी आदी उपस्थित होते.