सागरी शिवस्मारकामुळे मच्छीमारी धोक्यात

By Admin | Published: December 23, 2016 02:49 AM2016-12-23T02:49:25+5:302016-12-23T02:49:25+5:30

मुंबईतील राजभवना जवळील समुद्रात १५.९६ हेक्टर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारल्यास त्याचा मोठा फटका

Fishermen's threat due to marine Shivasmara | सागरी शिवस्मारकामुळे मच्छीमारी धोक्यात

सागरी शिवस्मारकामुळे मच्छीमारी धोक्यात

googlenewsNext

पालघर : मुंबईतील राजभवना जवळील समुद्रात १५.९६ हेक्टर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारल्यास त्याचा मोठा फटका पारंपरिक मच्छिमारीला बसणार आहे. शिवाजी महाराज्यांच्या नावावर राजकारणी आपली पोळी भाजून घेत असतांना विकासाच्या नावावर वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी असे प्रकल्प मच्छीमारांच्या माथी मारले जात असल्याने पालघरच्या किनारपट्टीवरील मच्छिमार तरूण-तरूणी, विद्यार्थी २४ डिसेंबरला काळ्या फिती लावून भाजप-सेनेचा निषेध व्यक्त करणार आहेत.
शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला ३८६ वर्षे पूर्ण होत असून आजही त्यांचा इतिहास जनता विसरलेली नाही. महाराजांच्या यशस्वी कालखंडात अनेक युद्धे जिंकताना कोळी-मच्छिमार समाजांनी त्यांना मोलाची साथ दिली होती. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणून ओळखले जात असताना त्यांच्या नावावर सत्ता उपभोगणारे राजकारणी मात्र मच्छिमार समाजाचे अस्तित्वच संपवायला निघाल्याचा उद्वेग सोशल मिडियाद्वारे व्यक्त केला जात आहे.
डहाणूतील वाढवण बंदर, जिंदाल (जेएसडब्लू) जेट्टी, एमआयडीसी तारापूर च्या प्रदूषित पाण्याची पाईप लाईन, तारापूर अणूऊर्जा प्रकल्प इ. अनेक विनाशकारी प्रकल्प पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यावर आणून इथला मच्छिमार, शेतकरी उध्वस्त करण्याचा डाव राजकारणी खेळत आहेत.
पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर राहणारा मच्छिमार समाज मागील २५ वर्षांपासून शिवसेना-भाजपचे खासदार, आमदार निवडून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना या पक्षांचे सरकार मच्छिमारीवर गदा आणत असल्याने जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या मच्छिमार पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे द्यावेत आणि आपली एकजूट दाखवावी असा आग्रह मच्छिमारांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर तरुणामधून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
अनेक माशांचे प्रजोत्पादनाचे स्थान नष्ट होणार
मुंबईच्या समुद्रात १५.९६ हेक्टर क्षेत्रावर ३ हजार ६०० कोटी रु पयांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाणार असल्याने कफपरेड, कुलाबा, माहीम येथील मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या शेवंड सह अनेक मच्छिचे प्रजोत्पादनाचे महत्वपूर्ण स्थान नष्ट होणार असल्याचे मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले. हे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरणाच्या अनेक महत्वपूर्ण बाबीची परवानगीच घेतली नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराजांच्या स्मारकाला विरोध नसल्याचे सांगून शासनाने निवडलेली जागा चुकीची असल्याने ती बदलावी अशी इच्छा मच्छीमारामधून व्यक्त केली जात आहे, असे ते म्हणाले.
‘मी प्रथम मच्छीमार समाजाचा घटक’ : बुधवारी संध्याकाळी कफपरेड येथील मच्छीमारांची या स्मारकाला विरोध करण्याबाबत सर्व मच्छिमार प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवरील मच्छिमार गावातील तरूण-तरु णी, विद्यार्थी, मच्छिमार २४ डिसेंबर रोजी काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त करणार असल्याचे भावेश तामोरे यांनी सांगितले. तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे देण्याबाबत सोशल मीडिया वरून मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे यांच्याशी संपर्क साधला असता मी प्रथम मच्छिमार समाजाचा घटक असून सर्व मच्छीमार एकमताने जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे लोकमतला सांगितले.

Web Title: Fishermen's threat due to marine Shivasmara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.