Join us

मासेमारी बंदी सुरु

By admin | Published: June 16, 2014 12:13 AM

१५ जूनपासून ३१ जुलैपर्यंत केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत.

उरण : १५ जूनपासून ३१ जुलैपर्यंत केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. पश्चिम तटवर्ती समुद्र क्षेत्रातील ४७ दिवसांच्या बंदीमुळे हजारो मच्छीमार बोटी करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड आदी विविध बंदरात नांगर टाकून विश्रांतीच्या तयारीला लागल्या आहेत. त्यामुळे विविध बंदरात मासेमारी नौकांची गर्दी वाढत चालली आहे. पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचा तुटवडा जाणवणार असल्याने मात्र मासळी खवय्यांचे चांगलेच हाल होणार आहेत.राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हवामान आणि निसर्गाच्या लहरीवरच चालणाऱ्या या व्यवसायावर सुमारे १२ लाखांहून अधिक कुटुंब उदरनिर्वाह चालवितात. विविध प्रकारातील मासेमारी व्यवसायातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. निर्यातीच्या व्यवसायातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र मच्छीमार व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सातत्याने होणारी इंधन दरातील वाढ, मासळीला न मिळणारा हमीभाव, संघटित दलालांकडून होणारी प्रचंड लुबाडणूक, शासनाकडून डिझेल परतावे मिळण्यास होणारा विलंब या तर मच्छिमारांना नित्याच्याच भेडसावणाऱ्या समस्या आहेत. (वार्ताहर)