जुहू बीच परिसरात मासेमारीस पोलिसांचा मज्जाव; मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 06:27 PM2020-10-12T18:27:21+5:302020-10-12T18:28:19+5:30
जुहू बीचवर रोज सकाळी मॉर्निंग वॉकला या परिसरात राहणारे उच्चभ्रू नागरिक आणि काही सेलिब्रेटी सुद्धा येतात.
मुंबई : जुहू बीचच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलच्या मागील बाजूच्या परिसरात छोट्या मच्छिमारांना मासेमारी करण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. येथे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पिढ्यांन पिढ्या मासेमारी करणाऱ्या येथील कोळी बांधवांना पोलिसांनी मासेमारीस मज्जाव केल्याने परिणामी जुहू मोरा गाव व जुहू कोळीवाड्याच्या मच्छिमारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एकीकडे कोरोनाने मच्छिमारांचे कंबरडे मोडले असतांना आता मासेमारी या एकमेव उदरनिर्वाहावर पोलिसांनीच बंदी घातल्याने घर कसे चालवायचे असा सवाल समाजसेवक सुनील कनोजिया यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपनगराचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करत त्यांनी येथे मासेमारी करणाऱ्या छोट्या मच्छिमारांना पोलिसांनी मज्जाव केला असून जर येथे मासेमारी कराल तर तुमच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलिसांनी येथील मच्छिमारांना दिला असल्याचे सुनील कनोजिया यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
जुहू बीचवर रोज सकाळी मॉर्निंग वॉकला या परिसरात राहणारे उच्चभ्रू नागरिक आणि काही सेलिब्रेटी सुद्धा येतात. जुहू बीच वर मॉर्निंग वॉकर्स आणि जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना येथे माश्याचा वास येत असल्याचे अनेक फोन पोलिसांना आल्याने येथे मासेमारीस पोलिसांनी बंदी घातली आहे. मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती कनोजिया यांनी दिली.
दरम्यान अशा प्रकारची कोणतीही मासेमारी बंदी घालण्यात आली नसून गैरसमजातून हा प्रकार घडला असावा. आपण स्वतः याप्रकरणी जुहू पोलिस ठाणे व सांताक्रूझ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी बोललो असल्याचे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अमित साटम यांनी लोकमतला सांगितले.