मच्छीमारांनी ४३ अटींची पूर्तता केल्यावरच होईल मासेमारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:46 AM2020-04-25T01:46:10+5:302020-04-25T01:46:25+5:30
मत्स्यव्यवसाय खात्याचे आदेश : मच्छीमारांमध्ये नाराजी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मच्छीमारांनी ४३ अटींची पूर्तता केल्यावरच बोटमालकांना मासेमारी करता येईल, या मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशामुळे राज्यातील मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
हा आदेश मागे न घेतल्यास लॉकडाउन उठविल्यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी दिला आहे. केरळ, तामिळनाडू व गोवा या राज्यांनी कोणत्याही अटी न घालता मासेमारी चालू ठेवली आहे, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’ला दिली. मासळी बाजारात किरकोळ विक्रीस बंदी घालून भांडलदारांच्या मोठ्या ट्रॉलर्सने १२ नॉटिकल जलाधी क्षेत्रात आणि केंद्र शासनाच्या विशाल आर्थिक क्षेत्रात मासेमारीला परवानगी देण्याच्या निर्णयाचा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने निषेध केला आहे.
कोरोनाच्या रोगापासून बचाव करण्यासाठी मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव व प्रधान सचिव मत्स्यव्यवसाय अनुपकुमार यांनी आदर्श कार्यप्रणालीच्या गोंडस नावाखाली एकूण ४३ जाचक अटींची पूर्तता करणाऱ्या नौकामालकाला मासेमारी करता येईल, असे जाचक निर्बंध टाकल्याचे तांडेल म्हणाले.
तसेच राज्यात १३ हजार यांत्रिक नौका व ७ हजार बिगरयांत्रिक नौका आहेत. त्यावर ९५ हजार ते १ लाख खलाशी प्रत्यक्ष काम करतात.
नौकामालकांना पुरेशा प्रमाणात हॅण्डवॉश, सॅनिटायझर, साबण व फेस मास्क यावेळी कुठून उपलब्ध करणार व कोण करणार, याची माहिती दिलेली नाही. तसेच राज्य शासनाने तीन विभागांचे बंदरात केंद्र उभारण्यास प्रत्येकी पाच कर्मचारी नेमले तर किमान अडीच हजार कर्मचारी लागतील याची शासनाने व्यवस्था केलेली नसताना असे आदेश कसे काय काढू शकतात, असा सवाल तांडेल यांनी केला.
या जाचक अटींची एकही नौकामालक पूर्तता करू शकणार नाहीत. समुद्रात मासेमारीला एकही नौका जाऊ शकणार नाही, याची या अधिकाºयाने खबरदारी घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला. या अटींमध्ये जिल्हाधिकारी व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी प्रत्येक बंदरात आरोग्य तपासणी केंद्र उभारावे. मासेमारी नौका बंदरावर/जेट्टीवर नांगरताना नौकेवरील खलाशांनी आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्राशी संपर्क साधावा. आरोग्य विभागाकडून पूर्णत: तपासणी आणि थर्मल स्कॅनिंंग झाल्यानंतर आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरीय नियंत्रण विभागाच्या परवानगीनंतर खलाशांना बंदरात उतरण्यास व मासेमारीस परवानगी देण्यात येईल. मासेमारी करून नौका बंदरात आल्यानंतर नौकेवरील सर्व खलाशांची थर्मल स्कॅनिंंग तपासणी झाल्यानंतरच बंदरावर/जेट्टीवर फिरण्यास मुभा राहील. आदींचा समावेश या अटींमध्ये आहे, अशी माहिती तांडेल यांनी शेवटी दिली.
आदेशातील जाचक अटी
मच्छीमारांनी पकडून आणलेले मासे मासळी बाजारात किरकोळ विक्रीस बंदी घालून भांडलदारांच्या मोठ्या ट्रॉलर्सने १२ नॉटिकल जलाधी क्षेत्रात आणि केंद्र शासनाच्या विशाल आर्थिक क्षेत्रात मासेमारीला परवानगी देऊन मच्छीमारांनी ४३ अटींची पूर्तता करून बोटमालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तव स्थानिक पोलिसांचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय मासेमारी करता येणार नाही, असा आदेशच राज्य शासनातर्फे मत्स्यव्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी गेल्या २० एप्रिल रोजी काढला आहे.