Join us

शाळा, महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांत फिशटँक

By admin | Published: June 29, 2017 3:12 AM

तारापोरवाला मत्स्यालय शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांत फिशटँक उभारण्याचा उपक्रम राबवणार आहे. फिशटँक १०० टक्के अनुदान तत्त्वावर दिले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तारापोरवाला मत्स्यालय शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांत फिशटँक उभारण्याचा उपक्रम राबवणार आहे. फिशटँक १०० टक्के अनुदान तत्त्वावर दिले जाणार आहेत. तसेच उपक्रमावर लक्ष ठेवण्याचे काम ‘नॅशनल फिशरीज् डेव्हलपमेंट बोर्ड’ (एनएफडीबी) या हैदराबाद येथील संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.शाळा, महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांत चार फूट लांब, दीड फूट रुंद आणि दोन फूट उंच असे एक फिशटँक लावण्यास सांगण्यात आले आहे. टँक, ८ एमएम काच, कव्हर, लाईट, एअर पंप व त्याचे कनेक्शन, बॅग्राऊंड पोस्टर, रंगीत खडी, फिल्टर, शो पीसचे साहित्य, नैसर्गिक किंवा प्लॅस्टिकची वनस्पती या साहित्याचा फिशटँक उपक्रमात समावेश असावा. फिशटँकमध्ये दोन ते अडीच इंचाचे १८ ते २४ मासे ठेवता येतील, यासाठी १२ हजार रुपये मत्स्यालय व्यवस्थापनाकडून दिले जाणार आहेत. यात गोल्ड फिश, ब्लॉक मूर, शुभंनकीन, सिल्वर शार्क, प्लॅटिरिया, एँजल, गप्पी, सकर शार्क हे समूहाने राहणारे मासे या फिशटँकमध्ये ठेवले जातील.तर माशांचे दुसरे फिशटँक १० फूट लांब, दोन फूट रुंद, तीन फूट उंच आहेत. या टँकमध्ये साहित्य आणि वस्तू त्याच राहतील. मात्र, माशांची संख्या दुप्पट ठेवावी लागेल. यासाठी ५५ हजार रुपये दिले जातील. यासाठी शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालये यांना अर्ज करावा लागेल. त्यानंतर मंजुरी दिली जाईल. शाळांमध्ये जीवशास्त्राच्या शिक्षकांनी यात प्रामुख्याने सहभाग नोंदवला पाहिजे, असे तारापोरवाला मत्स्यालयातील अभिरक्षक अजिंक्य पाटील यांनी सांगितले.