मुंबई : केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी फिट इंडिया फ्रीडम रन २.० चा प्रारंभ केला. देशभरात विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतदेखील एनएसजी कमांडो आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने दोन ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून फ्रीडम रनची सुरुवात झाली. यावेळी ५० एनएसजी कमांडोंनी धावण्यास सुरुवात केली. मुंबई हायकोर्ट, नरिमन पॉईंट यांसारख्या मुंबईच्या आयकॉनिक इमारतींचा समावेश असलेल्या मार्गातून ही दौड करण्यात आली. यानंतर गेटवे ऑफ इंडिया येथे ही दौड पूर्ण करण्यात आली. या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व निर्बंध पाळण्यात आल्याचे एनएसजीचे ग्रुप कमांडर कर्नल नीतेश कुमार यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्र संघटनेनेदेखील ऑगस्ट क्रांती मैदानावर दौड आयोजित केली होती. ज्यात २० स्वयंसेवक सहभागी झाले होते. ऑगस्ट क्रांती स्तंभ, गोवालिया टँकच्या येथून ही दौड सुरू करण्यात आली.
मुंबईप्रमाणेच दिल्ली व पुणे येथेदेखील या फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले होते. देशातील तरुणाईला फिट राहण्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे अनुराग ठाकूर यांचे म्हणणे आहे. ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त २ ऑक्टोबरपर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यातील ७५ ठिकाणी या ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात येणार आहे. 'फिटनेसचा डोस - अर्धा तास रोज' या मोहिमेला देशातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा उद्देश आहे.