Join us  

नोकरीसाठी ६०० रुपयात ‘फिटनेस सर्टिफिकेट’!, प. रेल्वेच्या दक्षता पथकाकडून भांडाफोड

By गौरी टेंबकर | Published: October 26, 2022 7:03 AM

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात बनावट प्रमाणपत्रे व ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी कार्यरत आहे, अशी टीप पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई: रेल्वेमध्ये नोकरीसाठी गरजूंना अवघ्या ६०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळीचा भांडाफोड मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने केला. पथकाने एका दुकलीला  मुंबई सेंट्रल रेल्वे  पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून विविध प्रकारचे साहित्य हस्तगत करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरात बनावट प्रमाणपत्रे व ओळखपत्रे बनवून त्याची विक्री गरजूंना करणारी टोळी कार्यरत आहे, अशी टीप पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार १७ ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांनी धाड टाकली. त्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र जारी करणे, आयआरसीटीसी ओळखपत्र, पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे, आयआरसीटीसी प्रवासी प्राधिकरण, रेल्वे पास प्रवास प्राधिकरण इत्यादी कागदपत्रे त्यांनी बेकायदेशीरपणे बनवल्याची आणि त्यांची विक्री केल्याची कबुली दिली. पुढील तपासात असेही आढळून आले की, पश्चिमसह मध्य रेल्वेमध्येही याच व्यक्तींद्वारे बनावट प्रमाणपत्र विक्री केली जात होती. त्यांनी   प्रति व्यक्ती ६०० रुपये आकारल्याचेही उघड झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

काय हस्तगत केले?दक्षता पथकाने या दुकलीकडून बनावट एक्स-रे अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्रे, रिक्त वैद्यकीय फॉर्म, भरलेले फॉर्म विविध केटरिंग कंत्राटदारांचे रबर स्टॅम्प, कोरी आणि भरलेली पोलीस पडताळणी प्रमाणपत्रे, कोरी आणि भरलेली ओळखपत्रे, आयआरसीटीसी प्रवासी प्राधिकरण हे सर्व हस्तगत केले.

आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांवर संशय!सूत्रांच्या म्हणण्यानुसार,  कथित बनावट प्रमाणपत्र घोटाळ्यात वैद्यकीय आरोग्य युनिटचे कर्मचारी आणि स्टेशन अधिकारी या एजंटांना भरपूर सहकार्य करत असल्याचे दक्षता विभागाच्या तपासणीत असे आढळून आले.  त्यानुसार आता पुढील चौकशी सुरू आहे.

पोलीस म्हणतात...रेल्वे ही लांब पल्ल्याच्या गाडीत अटेंडंट, स्वच्छता कर्मचारी आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी कंत्राटी तत्त्वावर आऊट सोर्सिंगने कर्मचारी नियुक्त करते. अशा लोकांना ही दुकली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र पुरवत असल्याचे अद्यापच्या चौकशीत समोर आले आहे. मात्र रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीसाठी या कागदपत्रांचा वापर झाल्याचे पुरावे नसून आम्ही तपास करत आहोत.- केदारी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे

टॅग्स :पश्चिम रेल्वेनोकरीगुन्हेगारी