मुंबई : नवरात्रोत्सव हा देवीच्या जागरणातील आनंदाबरोबरच गृहिणींच्या फिजिकल फिटनेसची पर्वणी ठरत आहे. नेहमी कुटुंब आणि कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणींनी फिटनेसचा नवा मंत्र शोधून काढला आहे. नवरात्रातील गरबारासमधील नृत्याद्वारे गृहिणी आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करीत आहे.
घर आणि नोकरीत व्यस्त असणाऱ्या गृहिणीला तिच्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, तर काही महिला रूढी-परंपरेत स्वतःला हरवून घेतात. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात महिला घर आणि मुलांचा सांभाळ याला प्राधान्य देतात, तर काही महिलांना कुटुंबाबरोबरच ऑफिसलाही प्राधान्य द्यावे लागते. दैनंदिन कामात स्वतःसाठी जीम दूरच, घरच्या घरी साधा योगा करण्यासाठीही वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून काही गृहिणींनी नवरात्रोत्सवाची संधी साधण्याचे ठरवले आहे.
मुलुंडसह विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीत मग्न असलेल्या काही महिलांशी संवाद साधताना या फिटनेस फंड्याची माहिती मिळाली. या गरबारासच्या पूर्वतयारीत गरब्याच्या तालावर तालावर पारंपरिक वेशभूषेत स्त्री- पुरुष थिरकताना दिसतात. यामध्ये महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे. मुळात डान्स हा फिटनेस राखण्याचाच मार्ग आहे.
व्यायामाचे विविध प्रकार हे डान्सच्या स्टेपमध्ये दिसून येतात. त्यामुळे महिलांना या स्टेप्स करणे तुलनेने सोपे जाते.
एवढेच नव्हे तर त्याच्या तयारीसाठी शिकवणीही लावली जाते. देवीच्या जागरणातील आनंद- उत्साहाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीही जपली जाते.
गरब्याच्या माध्यमातून शारीरिक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय अवयवांचा व्यायामही होतो. त्यामुळे या काळात अधिकाधिक महिला उत्साहाने गरबा खेळतात, असे दिसून येते.
कुटुंब आणि ऑफिस यात स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. मात्र, नवरात्रीच्या या नऊ दिवसांत गरब्याचा मनसोक्त आनंद घेत फिजिकल फिटनेसकडेही लक्ष देते.
-अर्चना गुप्ता, गृहिणी
घरच्या दैनंदिन कामकाजात स्वतःकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी गरब्याच्या माध्यमातून का होईना फिटनेस कसा जपता येईल, याकडे माझे लक्ष असते.
- सेजल शहा, गृहिणी
मुलीसोबत प्रॅक्टिस
वेळात वेळ काढून मुलीसोबत मुलुंडच्या कालिदास येथे गरब्याच्या क्लासेसला जाते. एकाच वेळी १० ते १५ जणींची बॅच सुरू असते. एक वेगळाच उत्साह असतो. त्यानिमित्ताने योगाही होतो. घरच्या कामातून वेळ काढत दुपारी तसेच रात्रीच्या वेळी आम्ही एकत्रित प्रॅक्टिस करतो.
- वर्षा जेठवा, गृहिणी, मुलुंड
मी स्वतः गरब्याचे क्लासेस घेते. येथे येणाऱ्या महिलांना गरबा खेळण्याची हौस असतेच, शिवाय आपला फिजिकल फिटनेसही याद्वारे कसा जपता येईल, हे बघण्याकडेही महिलांचा कल जास्त आहे.
- अनुजा पाटील,
गरबा शिक्षिका