संडे स्पेशल मुलाखत - ध्यानधारणा, योगा, व्यायामही गरजेचास्नेहा मोरे
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डाएटची क्रेझ सगळ्यांमध्येच दिसून येत आहे. मात्र, डाएट करायचा झाल्यास अनेक अडथळे येतात. त्यामुळे हीच डाएटची संकल्पना हलक्या फुलक्या शब्दांत आहारतज्ज्ञ मनीषा मेहता या पुस्तकातून घेऊन आल्या आहेत. त्यांच्या मते समतोल आहार हाच फिटनेसचा मंत्र आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न : ‘डाएट’ची नेमकी व्याख्या काय आहे?बहुतांश लोक ब्रेक फास्ट न घेणे, रात्रीचे जेवण म्हणून फक्त सूप वा सॅलड खाणे किंवा फक्त प्रोटिन्स घेणे असे एक ना अनेक प्रकार करतात, पण हे योग्य नाही. मुळात डाएट म्हणजे उपाशी राहणे असे अजिबात नाही, तर डाएट म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शरीरानुसार आवश्यक अन्नपदार्थ योग्य प्रमाणात व ठरावीक कालांतराने घेणे, त्यामुळे तुमच्या शरीरातील कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण संतुलित राहील.प्रश्न : निरोगी स्वास्थ्याकरिता आहारसोबतच अन्य कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?उत्तर : सध्या सगळीकडे ताणतणाव वाढत आहे. अगदी लहान मुलांपासून ते थेट साठीच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांनाच मानसिक ताणाला बळी जावे लागते. त्यामुळे निरोगी स्वास्थ्यासाठी जेव्हा विशेष आहाराचे नियोजन करण्यात येते, तेव्हा ताणमुक्तीसाठी समुपदेशनही करावे लागते. याशिवाय, आहाराप्रमाणेच ध्यानधारणा, योगा, व्यायाम, खेळणे गरजेचे आहे. गॅझेटपासून दूर राहणे, जीवनशैली बदलणे, झोप पूर्ण करणे या सर्व गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.प्रश्न : व्हिगन डाएट कसे असते?उत्तर : व्हिगन प्रकारच्या डाएटमध्ये प्राणीजन्य पदार्थ पूर्ण वर्ज्य असतात. व्हिगन डाएटमध्ये दूध, तूप, लोणी, बटर, चीझ यातले काहीही खाता येत नाही. त्याऐवजी केवळ वनस्पतीजन्य पदार्थांवर भर असतो. डाएटचा हा प्रकार अवलंबणे कठीण आहे. कारण आपल्याला माहीत नाही, अशा कितीतरी गोष्टींची गणती व्हिगन डाएटच्या लिस्टबाहेर जात होती. शिवाय, शरीराला आवश्यक नाहीत, पण केवळ सध्याच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून, ते आपल्या शरीरात येतच राहतात.‘डीटॉक्स डाएट’ची गरज काय?‘डीटॉक्स डाएट’मध्ये कधी-कधी एक प्रकारचा उपवास दिला जातो, ज्यात केवळ फळांचा रस घेता येतो. फळे, फळांचा रस यासोबत भाज्यांचा रस, सूप्स यासारख्या नैसर्गिक आहारावरही भर दिला जातो. पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थ दिले जातात. फळे आणि भाज्या खाऊन भरपूर सत्त्व पोटात गेल्याने ताजेतवाने आणि हलकेवाटू लागते. ‘डीटॉक्स डाएट’ची तशी शरीराला एरव्ही गरज नसते, पण बाहेरच्या खाण्या-पिण्याचा अतिरेक झाल्यावर त्याची गरज भासते.