Join us

पाच ‘अश्वमेध’ एसटीच्या ताफ्यात

By admin | Published: April 29, 2015 1:52 AM

मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणारा ‘बिझनेस क्लास’ प्रवासी नजरेसमोर ठेवून एसटी महामंडळाने आणखी हायटेक एसी बस या मार्गावरून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करणारा ‘बिझनेस क्लास’ प्रवासी नजरेसमोर ठेवून एसटी महामंडळाने आणखी हायटेक एसी बस या मार्गावरून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने स्वत: ७0 एसी बस विकत घेतल्या असून, यामध्ये प्रत्येकी एक कोटी किमतीच्या पाच बसचाही समावेश आहे. एक कोटी किमतीच्या या बसेस मुंबई-पुणे मार्गाबरोबरच बंगळुरू मार्गावरही चालविण्यात येणार आहेत. याआधी एक कोटी किमतीच्या व्होल्वो कंपनीच्या दोन एसी बस ‘अश्वमेध’ नावाने मुंबई-पुणे मार्गावर धावत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एकूण ७0 एसी बसपैकी अन्य सात एसी बस पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतील, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. एसटी महामंडळाकडे सध्या ११0 एसी शिवनेरी बस असून, यातील काही नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे. त्यामुळे महामंडळाने ३५ स्वत:च्या मालकीच्या आणि ३५ भाड्याच्या बस घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाड्याच्या बससाठी काढण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने एकूण ७0 एसी बस स्वत:च्या मालकीच्याच घेण्याचा निर्णय घेतला आणि या बसे विकतही घेतल्या. एसटी महामंडळाने ३५ व्होल्वो आणि ३५ स्केनिया कंपनीच्या बस विकत घेतल्या असून, यातील सात बस पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जम्बो मल्टी एक्सेल एसी बस सोडता अन्य बसची किंमतही जवळपास ८0 ते ८५ लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचेही सांगण्यात आले. व्होल्वो आणि स्कॅनिया या दोन्ही कंपन्या स्वीडन देशाच्या आहेत.