Join us

मेट्रो-३ चे कंत्राट पाच कंपन्यांना

By admin | Published: July 06, 2016 2:57 AM

कुलाबा-वान्द्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या सात पॅकेजेसच्या बांधकामांचे कंत्राट पाच कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी मान्यता

मुंबई : कुलाबा-वान्द्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गाच्या सात पॅकेजेसच्या बांधकामांचे कंत्राट पाच कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी मान्यता दिली. सात पॅकेजची एकूण किंमत ही १८ हजार ११४ कोटी रुपये ९ लाख इतकी आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींपैकी ८३ टक्के जमिन संपादित करण्यात आल्याची माहिती दिली. हा प्रकल्प २0२१ पर्यंत पूर्ण केले जाणार असून जवळपास १४ लाख प्रवाशांना त्याचा फायदा मिळेल. मेट्रो-३ हा ३३.५ किलोमीटरचा मार्ग असून २६ भुयारी आणि एक जमिनीवरील स्थानकाव्दारे जोडला जाईल. जायकाकडून या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मिळेल. या प्रकल्पाच्या बांधकामांचे कंत्राट मिळालेल्या कंपन्यांमध्ये एल. अ‍ॅन्ड. टी-एसटीईसीला दोन आणि जे.कुमार-सीआरटीजीला दोन तर एचसीसी-एमएमएस, डोगस-सोमा, सीएससी-आयटीडीसीएमला प्रत्येकी एका पॅकेजेसच्या बांधकामांचे कंत्राट मिळाले आहे. या कंपन्यांकडून स्थानकांचे बांधकाम केले जाईल. मेट्रो-३ हा मुंबईच्या दक्षिण व उत्तर टोकाला जोडणारा महत्वाचा मेट्रो मार्ग ठरेल. त्याचप्रमाणे नरीमन पॉर्इंन्ट व बीकेसीसारखी मुंबईतील महत्वाची व्यापार केंद्रे, आंतरराष्ट्रीय विमानतळ व एमआयडीसी व सीप्झसारखा औद्योगिक भागही जोडला जाईल. याशिवाय काळबादेवी, वरळी, प्रभादेवी सारखा उपनगरीय रेल्वेव्दारे न जोडला गेलेला भागदेखिल मेट्रोमुळे जोडला जाणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली. २0२१ मध्ये प्रकल्प पूर्ण होताच दररोज १४ लाख प्रवासी प्रवास करतील आणि हा आकडा २0३१ पर्यंत १७ लाखांवर पोहोचेल, असा दावाही त्यांनी केला. या बैठकीला मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक प्रकल्प एस.के.गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मेट्रो-३ मुळे मिळणारे फायदे- पश्चिम, मध्य रेल्वे, मोनोरेल आणि मेट्रो-१ साठी इंटरचेंज सुविधा मिळणार आहे. - आरामदायि प्रवासासाठी दहिसर ते मानखुर्द या मेट्रो-२ सोबत देखिल मेट्रो-३ जोडला जाणार आहे. - प्लॅटफॉर्म, स्वयंचलित भाडे आकारणी व आधुनिक डब्यांमुळे दर २.५ मिनिटांनी मेट्रो ट्रेन्स धावणे शक्य होईल. - दररोज ४ लाख ५६ हजार ७७१ रस्त्यावरील वाहनांच्या फेऱ्यांमध्ये घट होईल.- वायु व ध्वनी प्रदूषणाची घट- दररोज २ लाख ४३ हजार ३९0 लिटर इंधनाची बचत.- १५ कोटी ८१ लाख रुपयांची बचत होईल. - कार्बनडाय आॅक्साईड उत्सर्जन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर.