नवी मुंबई : राष्ट्रवादीनंतर नवी मुंबईमध्ये काँगे्रसमध्येही फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, युवक काँग्रेस अध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पाच नगरसेविकाही पक्षांतर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेवर काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक व काँगे्रसचे १० नगरसेवक होते. पाच अपक्ष नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक भाजपमध्ये गेले आहेत.महापौरांसह सहा नाईक समर्थक नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीमध्ये असून मनापासून तेथे फक्त तीन नगरसेवक आहेत. यानंतर आता काँगे्रसमध्येही फूट पडण्यास सुरुवात झाली आहे.माजी जिल्हाप्रमुख दशरथ भगत, ठाणे लोकसभा मतदारसंघ युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत, विजय वाळूंज, अंकुश सोनावणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्येही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.नगरसेविका अंजली वाळूंज, हेमांगी सोनावणे, फशीबाई भगत, वैजयंती भगत व रूपाली भगत या पाच नगरसेविकाही फक्त तांत्रिकदृष्ट्या काँगे्रसमध्ये राहिल्या आहेत. त्यांच्या परिवारातील सर्वांनी पक्षांतर केले आहे. यामुळे काँगे्रसला मोठा धक्का बसला आहे.माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांनी सांगितले की, काँगे्रसमध्ये असताना पक्षासाठी व शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगले काम केले. अजून चांगल्या पद्धतीने काम करता यावे, यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणावरही टीका करणे त्यांनी टाळले.
राष्ट्रवादीनंतर काँगे्रसमध्येही पडली फूट, नवी मुंबईत पाच नगरसेविका भाजपच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:12 AM