Join us

मुंबई विमानतळावर पाच कोटींचे विदेशी चलन जप्त; १७ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 1:41 AM

सीआयएसएफची नऊ महिन्यांतील कारवाई

खलील गिरकर मुंबई : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या तपासणीत ५ कोटी ४ लाख २ हजार ८७१ रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सीआयएसएफने केलेल्या कारवाईत सर्वांत जास्त ५ लाख २९ हजार ८३० अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले. त्याखालोखाल ७६ हजार ५०० युरो, ५८ हजार १४५ दिरहम व ३ लाख सौदी रियाल जप्त करण्यात आले. या सर्वांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सीआयएसएफने केलेल्या कारवाईअंतर्गत १५ जुलैला १ लाख २० हजार डॉलर्स व २४ जुलैला १ लाख ८० हजार डॉलर्स जप्त केले. ५ सप्टेंबर रोजी ३ लाख सौदी रियाल जप्त करण्यात आले.

विदेशी चलन मोठ्या प्रमाणात घेऊन जाताना अनेकांनी कपड्यांमध्ये हे चलन लपविले होते; तर काही तरुणींनी अंतर्वस्त्रामध्ये ते लपवून नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो फसला. विदेशी चलन ने-आण करण्याबाबत ज्या प्रवाशांकडे कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नव्हता अशा प्रवाशांनी लपवून विदेशी चलन नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा संशय आल्यावर सीआयएसएफच्या जवान व अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची सखोल तपासणी केल्यावर त्यांच्याकडे लपवून ठेवलेले विदेशी चलन सापडले. या प्रकरणी विदेशी चलन जप्त करून आरोपींना अटक करण्यात येते व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. आरोपींमध्ये भारतीयांसोबत, इराण, केनिया, टांझानिया, अदिस अबाबा, जपान, सेनेगल, ऑस्ट्रेलिया या देशांच्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती सीआयएसएफतर्फे देण्यात आली.अटक आरोपींमध्ये आठ महिलांचा समावेशया प्रकरणी एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात आठ महिला आहेत. १७ पैकी ६ आरोपी भारतीय असून यात एका महिलेचा समावेश आहे.तर अन्य ११ आरोपी परदेशातील असून यात ७ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांत परदेशी महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :पोलिस