लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केईएम रुग्णालयातील ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ मध्ये दोन लेखापालने पाच कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी लेखापाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन राऊळविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राऊळला अटक करण्यात आली असून, देसाईचा शोध सुरू आहे.
केईएम रुग्णालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९१ च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या स्वायत्त संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व आनुषंगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते.
गेल्या दहा वर्षांत संस्थेतील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लेखापाल आणि लिपिकाने बनावट सह्याद्वारे तसेच खोटी कागदपत्रे तयार करून सदर स्वायत्त संस्थेचा निधी अन्यत्र वळविला. यात पाच कोटींचा अपहार केला. ही बाब संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख यांना समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली असल्याच्या वृत्ताला भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद कांबळे यांनी दुजोरा दिला, तर अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याचेही सांगितले. राऊळ हा कळवा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
...