मुंबई : अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सुशोभीकरणाचा आणि रोषणाईचा धडाका लावला आहे. उड्डाणपूल, रस्त्यांवरील दिव्यांचे खांब तसेच चौपाट्या विद्युत रोषणाईने उजळून निघत आहेत. या झगमगासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. टीका होऊनही पालिका आपल्या निर्णयावर कायम आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
‘ए’ वॉर्डातील साधू टी.एल. वासवानी, जी.डी. सोमाणी मार्गावरील पदपथावर रोषणाई तसेच सुशोभीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. या कामाकरिता अंदाजे २ कोटी २८ लाख १६ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. याच वॉर्डातील साधू टी.एल. वासवानी मार्गावरील कुलाबा वूड्स गार्डनचा परिसर सुशोभित केला जाणार आहे. याही ठिकाणी पदपथ, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्याही सुशोभीकरणाची कामे केली जाणार असून, त्यासाठी १ कोटी ८१ लाख ६१ हजार खर्च अपेक्षित आहे.
‘पी’ डिमेलो मार्ग :
या मार्गावर डेकोरेटिव्ह पोल्सची उभारणी केली जाणार आहे. त्याकरिता ३ कोटी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. कूपरेज गार्डन सुशोभीकरणासाठी १ कोटी ११ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या दोन्ही ठिकाणी विविध पदपथ, रस्ते, दुभाजक, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागा, विजेचे खांब या ठिकाणी रोषणाई , रंगरंगोटी व सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
‘जी-२०’ परिषदेपासून सुरुवात :
मुंबईत काही महिन्यांपूर्वी भरलेल्या जी-२० परिषदेसाठी सर्वप्रथम अनेक महत्त्वाची ठिकाणे रोषणाईने उजळून निघाली होती. त्यानंतर मग अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर रोषणाई केली जाऊ लागली असून ती कायमस्वरूपी आहे.
‘करदात्यांच्या पैशांचा गैरवापर’
पालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतेक सर्व उड्डाणपुलांना रोषणाई केली आहे. या उड्डाणपुलांवरील विजेच्या खांबानांही रोषणाई करण्यात आली आहे. शहर सुंदर दिसावे यासाठी मुंबई सुशोभीकरण कार्यक्रमांतर्गत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे. उड्डाणपुलांसह चौपाट्याही उजळून काढल्या जात आहेत. दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर अंधेरी पश्चिमेकडील सागर कुटीर आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्याजवळ गोबो प्रोजेक्शनद्वारे रोषणाई केली जाणार असून, त्यासाठी २६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या झगमगटावर वॉचडॉग फाउंडेशनने टीका केली होती. हा करदात्यांच्या पैशाचा गैरवापर आहे. या झगमगाटामुळे नैसर्गिक वातावरणात व्यत्यय येत असून पर्यावरण आणि आरोग्यास धोका पोहोचत आहे, असा आक्षेप त्यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नोंदविला होता.