मुंबई : दुबईहून न्हावा शेवा येथे आलेल्या कंटेनरमध्ये धातूच्या पाइपमध्ये लपवून आणलेले ५ कोटी ५४ लाख रुपये किमतीचे १९ किलो सोने शुक्रवारी महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (डीआरआय) जप्त केले. दुबईहून आयात केलेल्या सामग्रीमध्ये लपवून या सोन्याची तस्करी केली जात होती. याबाबत वाशीमधील शौर्य एक्झिमचे मालक राजेश भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. न्हावा शेवा येथील हिंद टर्मिनलमध्ये आलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी धातूच्या पाइपमध्ये लपवून हे सोने आणले होते. या पाइपला एका बाजूने बंद केले होते. त्यात सोन्याची नाणी लपविली होती.
दुसऱ्या बाजूने या पाइपना नट व बोल्ट लावून बंद केले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमधील सामग्रीची तपासणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पाइपमधून २४ कॅरेट दर्जाचे १६३ बार लपवून आणले होते. त्यांचे वजन १९ किलो होते. या सोन्याची किंमत ५ कोटी ५४ लाख रुपये आहे. डीआरआयचे सहआयुक्त समीर वानखेडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला.गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईत १३५ किलो सोने जप्तडीआरआयने गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतून १३५ किलो सोने जप्त केले. त्यानंतर आताच्या कारवाईत १९ किलो सोने जप्त केले.