राज्यात पाच वर्षांत अवघे ३४ सायबर गुन्हे निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:29 AM2020-01-08T05:29:36+5:302020-01-08T05:29:49+5:30

गेल्या पाच वर्षांत राज्यभरात सायबरचे १६ हजार गुन्हे दाखल झाले असून, प्रशिक्षित अधिकाऱ्यांअभावी त्यापैकी अवघे ३४ गुन्हे निकाली लागले आहेत.

Five cyber crime cases were recovered in the state in five years | राज्यात पाच वर्षांत अवघे ३४ सायबर गुन्हे निकाली

राज्यात पाच वर्षांत अवघे ३४ सायबर गुन्हे निकाली

Next

मनीषा म्हात्रे
मुंबई : गेल्या पाच वर्षांत राज्यभरात सायबरचे १६ हजार गुन्हे दाखल झाले असून, प्रशिक्षित अधिकाऱ्यांअभावी त्यापैकी अवघे ३४ गुन्हे निकाली लागले आहेत. या, सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या चक्रव्यूहात तरुणींसह अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
राज्यभरात दिवसाला सरासरी १० सायबर गुन्ह्यांची नोंद होत आहे. फिशिंग, विवाह संकेतस्थळावरून फसवणूक, ओळख चोरी, फोटोमधील फेरबदल, बँकांसंदर्भातील फसवणूक, बालकांसंदर्भातील पोर्नोग्राफी, सायबर बुलिंग, आॅनलाइन गेमिंग, खोटी माहिती देणारी संकेतस्थळे, सायबर मानहानी, धमकाविणे, खंडणी अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे. राज्यभरात २०१५मध्ये २,१९५ विविध सायबर गुन्हे दाखल होते. त्यापैकी १७ गुन्हे निकाली लागून ३५ जणांना दोषी ठरविण्यात आले. त्याच तुलनेत दिवसागणिक हा आकडेवारीचा आकडा वाढत असून, दोषसिद्धीचे प्रमाण घटत आहे. २०१८मध्ये दाखल गुन्ह्यांपैकी १ प्रकरण निकाली लागले. आॅक्टोबर २०१९पर्यंत ३,७२८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६५३ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले. गेल्या पाच वर्षांत एकूण १६,०५१ गुन्हे दाखल झाले असून, यापैकी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ६,७६९ गुन्ह्यांचा समावेश आहे. मनुष्यबळाअभावी गुन्ह्यांचा तपासाचा वेग मंदावत आहे. जिथे ५ हजार मनुष्यबळाची आवश्यकता आहे तिथे अवघे ५०० पोलीस कार्यरत आहेत. त्यात प्रशिक्षित अधिकारी मिळत नसल्याचे सायबर पोलिसांच्या अडचणी वाढत आहेत. ज्यांना प्रशिक्षण मिळते, ते कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांची बदली होते. त्यामुळे मनुष्यबळाबरोबर प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या मागणीसाठी सायबर पोलिसांकडून वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
यात, विविध फसवणुकींबरोबरच लैंगिक छळाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्याच धर्तीवर महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना म्हणून ‘सायबर सेफ वुमन’ मोहीम ३ जानेवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. पहिल्या ३ दिवसांतच १५०हून अधिक सायबर सुरक्षेबाबतची व्याख्याने घेण्यात आली. यात आतापर्यंत ४५ हजार नागरिकांपर्यंत सायबर पोलीस पोहोचले आहेत. पुढेही सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सायबर अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी सांगितले.
>गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी
वर्ष दाखल गुन्हे उकल अटक आरोपी खटला पूर्ण निकाल दोषी
२०१५ २१९५ ७७७ ८२५ ५२ १७ ३५
२०१६ २३८० ७९१ १००८ ३० ११ १९
२०१७ ४०३५ १०४१ १३६७ १५ ५ १०
२०१८ ३७१३ ११७२ १४६७ ८ १ ७
२०१९ ३७२८ ६५३ ७५८ - - -
(आॅक्टो.)
>मुंबईतील आकडेवारी
वर्ष दाखल गुन्हे उकल अटक आरोपी
२०१५ ९६४ २०७ २९६
२०१६ ९७४ १८२ ३४८
२०१७ १२२७ १९६ ५०८
२०१८ १४८१ ४०७ ५७५
२०१९ २११८ २२६ ३२७
एकूण ६७६९ १२१८ २०५४

Web Title: Five cyber crime cases were recovered in the state in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.