मुंबई - राज्यभरातील हाॅटेल्सची अन्नसुरक्षाविषयक तपासणी केल्यानंतर प्रतिबंधित अन्नपदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली. राज्यात २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान पाच दिवसांत विविध ठिकाणी कारवाई करत एकूण १८० दुकानांना टाळे लावून एकूण २९ लाख ६६ हजार ९२८ रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान, आतापर्यंत २२२ आरोपींना अटक करण्यात आली अशून पोलीसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापूर्वी, एप्रिल २०२३ पासून २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने राज्यात एकूण ६७६ ठिकाणी कारवाई करून ९५ वाहने जप्त केली असून ४१३ आस्थापना सीलबंद केल्या आहेत. तसेच एकूण १७ कोटी ६४ लाख ७४ हजार ६७४ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. सर्वप्रकरणी पोलिसांकडे गुन्हे नोंदविण्यात आले असून एकूण ७०९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात जुलै २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थाच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून) व विक्रीस जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात येत आहे. त्यानुसार, २० जुलै २०२३ पासून या अन्न पदार्थावर एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.
छुप्या मार्गाने विक्री करणारे रडारवरअन्न पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक महाराष्ट्र राज्यामध्ये व महाराष्ट्र राज्यातून व विक्रीस प्रतिबंध असला तरीही काही असामाजिक तत्वे चोरीछुपे मार्गाने या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या विक्रीचा व्यवसाय आर्थिक लाभाच्या हेतूने करत असतात. या असामाजिक तत्त्वावर आळा बसावा तसेच बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन सदैव तत्पर असून या प्रतिबंधित पदार्थाचा अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ व नियम, २०११ नुसार कारवाई करण्यात येत आहे. - शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग