Join us  

पाच दिवस सुट्टी, नियोजन केले नसेल तर घरीच बसा... रिसॉर्ट फुल्ल, तिकिटे महागली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 9:00 AM

महामुंबई परिसरातील रिसॉर्ट फुल्ल, तिकिटे महागली, बुकिंगही मिळणार नाही

- मनोज गडनीसलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घड्याळाच्या काट्यागत सतत धावणारे मुंबईकर वीकएण्डची आतुरतेने वाट पाहात असतात. शनिवार-रविवारची सुट्टी म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, याच शनिवार-रविवारला जोडून अन्य काही सुट्ट्या आल्यास मुंबईकरांची पावले आपसूक पर्यटनस्थळांकडे वळतात. अगदी तस्साच योग पुढील आठवड्यात आला आहे. १२ ते १६ ऑगस्ट अशा घसघशीत पाच दिवसांच्या सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे सुट्टीचे प्लॅन तयार झाले आहेत. महामुंबई परिसरातील रिसॉर्ट, हॉटेल फुल्ल झाले आहेत. 

१२ आणि १३ ऑगस्टला शनिवार-रविवार असून त्यानंतर १४ ऑगस्टची सुट्टी टाकल्यास स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आहेच, शिवाय परत १६ तारखेला पारशी नववर्षाची सुट्टी आहे. त्यामुळे पाच दिवसांच्या सुट्टीचे प्लॅनिंग झाले आहे. महामुंबई परिसर तसेच लोणावळा, खंडाळा येथील रिसॉर्टमध्ये हाऊसफुल्ल बुकिंग झाल्याची माहिती हाती आली आहे. सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना कर्जत, नेरळ, कसारा, इगतपुरी, अलिबाग, किहीम, लोणावळा, खंडाळा अशा मुंबई नजीकच्या पर्यटनस्थळांचे वेध लागले आहेत. या सर्व परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. काही रिसॉर्ट मालकांनी या सुट्ट्यांसाठी विशेष पॅकेज तयार केली आहेत. तर, एक किंवा दोन दिवसांचे देखील पॅकेज तयार करण्यात आले आहेत. रिसॉर्टच्या दर्जानुसार एक रात्र दोन दिवस याकरिता ३५०० रुपये ते ५००० हजार रुपये असे दर आकारले जात आहेत. तर मोठ्या मुक्कामासाठी ही रक्कम प्रति रात्र १० हजारांपासून तब्बल २५ हजारांपर्यंत देखील दर आकारले जात असल्याची माहिती पर्यटन प्लॅनर अभिजित कुलकर्णी यांनी दिली.

विमान प्रवासही महागलामोठ्या सुट्ट्यांमुळे अनेकांनी राज्याबाहेर देखील जाण्याच्या योजना बनवल्या आहेत. याकरिता विमान प्रवास करू पाहणाऱ्या लोकांना घसघशीत पैसे खर्च करावे लागणार आहेत. मुंबई-गोव्याचे विमान प्रवासाचे परतीसह दर हे १५ हजारांच्या घरात गेले आहेत. मुंबई-काश्मीर २० हजार रुपये, मुंबई-कोची १५ हजार, मुंबई-बंगळुरू १६ हजार असे दर आहेत.

कला जोपासण्यासाठीनेरळ, कर्जत येथील काही रिसॉर्टवर आर्ट थीम ठेवण्यात आली असून फोटोग्राफी, चित्रकला किंवा लेखन यासाठी येणाऱ्या लोकांना तिथे १० टक्क्यांची विशेष सूट देण्यात आली आहे. तर अशा उत्सुक लोकांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वर्कशॉपही आयोजित करण्यात आले आहे. 

पाककलेची हौस भागवाकर्जत, लोणावळा, खंडाळा येथील काही रिसॉर्ट मालकांनी पर्यटकांना जर स्वतःच स्वयंपाक करायचा असेल तर त्यासाठी आपले किचन खुले करून दिले आहे. त्यामुळे अनेकांना आपली पाककलेची हौस भागवता येणार आहे.