Join us

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा पाच दिवसांचा मग पगार सात दिवसांचा का? बच्चू कडूंचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 7:55 PM

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई - राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या २९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयावर सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा हा पाच दिवसांचा असेल तर पगार तरी सात दिवसांचा का द्यायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयावरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ''सरकारी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा केला तर त्यांना सात दिवसांचा पगार तरी का द्यायचा. सातवा वेतन आयोग आहेच. खरंतर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा केला तरी चालेल. पण जे दोन दिवसही काम न  कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा का करायचा. काही कर्मचाऱ्यांच्या टेबलांवरून फाईल महिना महिना पुढे सरकत नाही, अशा कामच न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाभ का द्यायचे?'' असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान,राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची मागणी केली होती. ही मागणी महाविकास आघाडी सरकारने आज मान्य केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी असून त्यांचा विकेंड आनंदात जाणार आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पाच दिवसांचा आठवडा करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी गेल्या मंगळवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. त्यानंतर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचाच आठवडा आहे. तर, देशातील 7 राज्यांमधील कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा असून 2 दिवस सुट्टीचा लाभ मिळत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा विकेंड कुटुंबासमवेत आनंदी जाणार आहे.  

टॅग्स :बच्चू कडूमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र