मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विस्थापित झालेले दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक फिट्जगेराल्ड फाउंटन अखेर पाच दशकांनंतर पुन्हा एकदा मूळ जागेवर स्थापन होणार आहे. ४० फुटांची ही वास्तू भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर मेट्रो सिनेमासमोरील जागेत हे कारंजे पुन्हा एकदा दिमाख्यात उभे राहणार आहे़सर विलियम रॉबर्ट सेमूर वसी-फिट्झराल्ड हे १८६७ ते १८७२ या काळात मुंबईचे राज्यपाल होते. मुंबई महापालिकेच्या स्थापनेआधीही मेट्रो सिनेमासमोरील वाहतूक बेटाच्या ठिकाणी १८६७ मध्ये फिट्जगेराल्ड फाउंटन (कारंजे) उभारण्यात आले. मात्र १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात ही वास्तू काढून तिची रवानगी वस्तुसंग्रहालयात झाली. अलीकडेच महापालिकेने मुंबईतील अशा पुरातन वास्तूंची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फोर्ट येथील फ्लोरा फाउंटनच्या पुनर्स्थापनेनंतर आता फिट्जगेराल्ड फाउंटनवर काम सुरू करण्यात आले आहे. या वास्तूमधील अडीचशे ते तीनशे छोटे-छोटे भाग काळानुरूप झिजले अथवा निखळले आहेत. त्यामुळे पुनर्स्थापनेआधी या वास्तूवरील शतकोपूर्वीची चमक पुन्हा आणण्याचे काम भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात सुरू आहे. यासाठी ब्रिटन येथील संशोधक आणि वास्तुरचनाकारांचेही मार्गदर्शन घेण्यात येत असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पावर अर्बन डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट महापालिकेचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. मेट्रो सिनेमागृहासमोरील त्रिकोणी वाहतूक बेटाच्या ठिकाणी फिट्झराल्ड फाउंटन उभे राहणार आहे. मात्र याच ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग असल्याने या वास्तूच्या पुनर्स्थापनेसाठी असलेले खोदकाम काळजीपूर्वक करावे लागत आहे.>या ठिकाणी असलेले सिग्नल आणि पथदिवा काढण्यात आला आहे. पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाने पुनर्स्थापनेचे काम सुरूही केले होते. परंतु मान्सून काळात कोणत्याही खोदकामाला परवानगी नसल्याने पूल विभागाने आक्षेप घेतला आहे. त्यानुसार आता आॅक्टोबरमध्येच या फाउंटनची पुनर्स्थापना होणार आहे.१५२ वर्षे जुन्या असलेल्या या फाउंटनला तिची चमक पुन्हा मिळवून देण्यासाठी पुरातन वास्तू विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या फाउंटनवरील छोटा दिवाही पुन्हा बसविण्यात येणार आहे.
पाच दशकांनंतर फिट्जगेराल्डची होणार पुनर्स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:17 AM