दोन नाटकांचे सहा अंक दिग्दर्शित करणार पाच दिग्दर्शक
By संजय घावरे | Published: March 18, 2024 07:39 PM2024-03-18T19:39:48+5:302024-03-18T19:40:05+5:30
मधुसूदन कालेलकरांच्या नाट्य महोत्सवात रंगणार अभिनव प्रयोग
मुंबई - श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये मधुसूदन कालेलकर लिखित नाटकांचा तीन दिवसीय महोत्सव सुरू होणार आहे. या महोत्सवात पाच दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या तीन अंकी दोन नाटकांचा अभिनव प्रयोग पाहायला मिळणार आहे.
१९ ते २२ मार्च या काळात होणाऱ्या चार दिवसीय महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित 'दिवा जळू दे सारी रात', 'डार्लिंग डार्लिंग' आणि 'नाथ हा माझा' ही तीन नाटके होणार आहेत. दिग्दर्शक विजय राणे यांच्या संकल्पनेतून 'दिवा जळू दे सारी रात' आणि 'डार्लिंग डार्लिंग' या तीन अंकी नाटकांचे प्रत्येक प्रयोग पाच वेगवेगळे दिग्दर्शक वेगळ्या नाट्यसंस्थांसाठी सादर करणार आहेत. 'डार्लिंग डार्लिंग'चा पहिला अंक पार्थ थिएटर्ससाठी मंगेश सातपुते, दुसरा व तिसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्ससाठी गणेश पंडीत दिग्दर्शित करणार आहेत. 'दिवा जळू दे सारी रात'चा पहिला अंक अभिनय संस्थेसाठी अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनअॅक्टसाठी श्रीनिवास नार्वेकर आणि तिसरा अंक माणूस फाऊंडेशनसाठी डॉ. सोमनाथ सोनवलकर करणार आहेत. या संकल्पनेबाबत 'लोकमत'शी बोलताना विजय राणे म्हणाले की, माझ्या मनात एक संकल्पना आली. आजच्या काळातील कलावंतांचा कालेलकरांसारख्या महान नाटककारांच्या नाटकात सहभाग असावा, त्यांना त्यांची भाषा समजावी, तरुण कलाकारांपर्यंत त्यांचे नाटक पोहोचावे यासाठी पाच दिग्दर्शकांना नाटकाच्या तीन अंकांचे दिग्दर्शन करायला सांगितले. 'दिवा जळू दे सारी रात' आणि 'डार्लिंग डार्लिंग' हि नाटके तीन अंकी आहेत. हे तीन अंक वेगवेगळ्या संस्था सादर करणार आहेत. यात कलाकार वेगळे असले तरी नाटक म्हणून ते एकत्रितपणे सादर होणार असल्याचेही राणेंनी सांगितले.
.........................
- मंगेश सातपुते (अभिनेता, दिग्दर्शक)
संकल्पना ऐकताच वेगळ्या कलाकारांसह प्रत्येक अंक कसा दिसेल याबाबत कुतूहल जागं झालं. प्रत्येक अंकाचं दिग्दर्शन वेगळं, कलाकार वेगळे, दिग्दर्शकाची विचार करण्याची पद्धत वेगळी, पण कथानक सलग हे नावीन्यपूर्ण असल्याने होकार दिला. कालेलकरांचं ५० वर्षांपूर्वीचं लेखन आजही ताजं आहे. त्या काळातील लेखकांच्या ताकदीची जाणीवही झाली.
...............................
सहा अंक, ४५ कलाकार...
'डार्लिंग डार्लिंग'च्या पहिल्या अंकात विशाल मोरे, धनश्री पाटील, श्रीश बागवे, ओंकार सातपुते, संजय गोसावी, प्रगती भोसले, विनोद सोमल, पल्लवी शिवाजी, प्रथमेश देवकुळे, सुरेश जाधव, तर दुसऱ्या-तिसऱ्या अंकात कौस्तुभ दिवाण, ऋग्वेद फडके, धनश्री धुरी, सावित्री मेधातुळ, आसावरी ऐवळे, स्वानंद केतकर, सौरभ पवार, नामांतर कांबळे, ललिता अमृतकर, साबा राऊळ हे कलाकार आहेत.
'दिवा जळू दे सारी रात'च्या पहिल्या अंकात स्वागत पोवार, धनंजय कुलकर्णी, रोशन मोरे, संकेत गुरव, श्रेयसी वैद्य, वंदना गुजरे, मनाली राजेश्री, दुसऱ्या अंकात अमृता मोडक, समीर दळवी, आशुतोष घोरपडे, विनीत मराठे, विलास जाधव, प्रणोती कणगुटकर, सुगत उथळे, आरती मोरे, श्रीनिवास नार्वेकर आणि तिसऱ्या अंकात सोनल शिंदे, ग्रेगरी फर्नांडीस, कुणाल पानसरे, प्रथमेश सावंत, प्रणाली कदम, माधुरी वैगणकर, सोमनाथ सोनवलकर, कुणाल निकम, सुधीर पाटणकर हे कलाकार आहेत.