भातसाचे पाच दरवाजे उघडले, बारवीही भरण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:22 AM2020-08-30T06:22:36+5:302020-08-30T06:23:05+5:30
भातसा धरणाच्या उघडण्यात येणाऱ्या पाच दरवाजांपैकी १, ३ आणि ५ क्रमांकांचे दरवाजे अर्ध्या मीटरने, तर २ व ४ क्रमांकांचे दरवाजे पाव मीटरने उघडले आहेत. यामुळे भातसा धरणातून ९३८४ क्युसेक पाण्याचा प्रवाह विसर्ग करण्यात आला आहे.
ठाणे - गेल्या दोन दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापैकी तीन दरवाजे अर्ध्या मीटरने, तर दोन दरवाजे पाव मीटरने उघडले आहेत. तसेच बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच कोणत्याही क्षणी उघडणार आहेत. यामुळे भातसा व बारवी धरणांखालील नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसा धरणाच्या उघडण्यात येणाऱ्या पाच दरवाजांपैकी १, ३ आणि ५ क्रमांकांचे दरवाजे अर्ध्या मीटरने, तर २ व ४ क्रमांकांचे दरवाजे पाव मीटरने उघडले आहेत. यामुळे भातसा धरणातून ९३८४ क्युसेक पाण्याचा प्रवाह विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे सापेगाव व या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा संबंधित सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवकांद्वारे भातसानगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी लेखी पत्राद्वारे दिला आहे. बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाणी जादा होताच उघडणार आहेत. यामुळे बारवी धरण व नदीकाठावरील अस्नोली, राहटोली, चोण, सागाव पाटीलपाडा, चांदप, पादीरपाडा, पिंपळोली, कारंद, चांदपपाडा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात सरासरी ४७ मिमी पाऊस
ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सरासरी ४७.०६ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये ठाणे तालुक्यात ४६ मिमी, कल्याण ४५, मुरबाड २०, भिवंडी ६३, उल्हासनगर ७८ आणि अंबरनाथला ६७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.