कोकण रेल्वेची पंचविशी
By admin | Published: October 14, 2015 11:37 PM2015-10-14T23:37:03+5:302015-10-15T00:40:05+5:30
स्थापना वर्धापनदिन : प्रभूकृपेने दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा
रत्नागिरी : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत एका पायावर (ट्रॅकवर) धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चालेल की नाही, अशा संभ्रमावस्थेतच १९९६ पासून कोकण रेल्वे खड-खट्ट-खड खट्ट करीत मार्गावरून धावू लागली. ‘आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी’ म्हणत मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेचे कोकणवासीयांनी भरभरून कौतुक केले व अफाट प्रतिसादही दिला आहे. कोकण रेल्वे स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षात कोकणातीलच सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने आता कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बॅ. नाथ पै यांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी राजापूर लोकसभा मतदारसंघाचे तत्कालिन खासदार प्रा. मधु दंडवते यांनी या प्रकल्पासाठी खरा पुढाकार घेतला. केंद्रात पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री असताना प्रा. दंडवते, रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच पंतप्रधान सिंग या त्रयींच्या पुढाकारातून कोकण रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. त्यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचा सहभाग मिळाला अन एकाचवेळी अनेक नियोजित स्थानकांवरून प्रकल्पाचे काम सुरू झाले.
कोकण रेल्वे प्रकल्पाची स्थापना कोकण रेल्वे कॉर्पाेरेशन लिमिटेडच्या रुपाने झाली. १५ आॅक्टोबर १९९०ला या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. त्यानुसार पुढील टप्प्यांत प्रकल्पाचे काम सुरू झाले. रोहा ते मंगळुरू या ७४१ किलोमीटर्स अंतराच्या मार्गासाठी समान अंतराचे सहा विभाग बनविण्यात आले. त्यानुसार महाड, रत्नागिरी, कुडाळ, पणजी, कारवार व उडुपी असे हे सहा विभाग कामाच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आले. प्रत्येक विभागात १०० किलोमीटर्सचे काम सुरू झाल्याने कोठेही काम अडले नाही. रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी ई श्रीधरन यांनी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून योग्य मार्गदर्शन केले व कोकणवासीयांना स्वप्नवत वाटणारा कोकण रेल्वे प्रकल्प अखेर पूर्ण झाला. (प्रतिनिधी)
२००० पूल : ९१ बोगदे, ४३ हजार जमीनमालकांची मान्यता
कोकण रेल्वे या विसाव्या शतकातील मोठ्या व सर्वात अवघड अशा प्रकल्पात २ हजार छोटे मोठे पूल, ९१ बोगदे उभारण्याचे आव्हान अवघड होते. कोकणच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे अवघड कामही तंत्रज्ञानाच्या बळावर पूर्ण झाले. त्यात काही कामगारांना प्राणही गमवावा लागला. ४३ हजार जमीन मालकांकडून वर्षभरात या प्रकल्पासाठी जागा मिळविण्यात यश आल्यानेच प्रकल्प पूर्ण झाला.
प्रभू उद्या रत्नागिरीत
केंद्रीय रेल्वेमंत्री १६ रोजी रत्नागिरीत येणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या हस्ते सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्याची लगबग सुरू झाली आहे.
स्थापनादिन कार्यक्रम
गुरूवार, दि. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी कोकण रेल्वेचा २५वा स्थापना दिवस रत्नागिरीसह कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर साजरा होत आहे. रत्नागिरीत यानिमित्ताने कर्मचारी मेळावा व प्रदर्शन यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.