लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात हमखास तुंबणाऱ्या सांताक्रूझ, खार या भागांची सुटका करण्यासाठी महापालिकेचे उपाय योजना सुरू आहेत. त्यानुसार वाकोला आणि मिठी नदीजवळील परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात पाणी साचण्याची घटना टाळण्यासाठी पाच महत्त्वाच्या ठिकाणी पूरनियंत्रण दरवाजे उभे केले जाणार आहेत. त्यामुळे भरतीचे पाणी पर्जन्य वाहिन्यांमधून परिसरात येणार नाही. तसेच अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी पंपातून नदीत सोडणे शक्य होणार आहे.
सांताक्रुझ पूर्व परिसरात असणाऱ्या विविध पर्जन्य जलवाहिन्यांची मुखे वाकोला आणि मिठी नदीला येऊन मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी आणि भरतीच्यावेळी पाणी साचण्याच्या घटना घडतात. २००५ मध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा मोठा फटका सांताक्रुझ विभागाला बसला होता. हा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. भरतीचे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये शिरू नये, तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा पंपाच्या माध्यमातून वाकोला आणि मिठी नदीत करण्यासाठी पाच ठिकाणी पूरनियंत्रण दरवाजे बांधले जाणार आहेत.
सर्व प्रकारचे दरवाजे हे आरसीसी पद्धतीचे असणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाने मे. हितेश एंटरप्राईजेस या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी २० लाख ३६ हजार ४३६ रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पावसाळा वगळता चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.
या पाच ठिकाणी पूरनियंत्रण दरवाजे ....
गोळीबार नाल्याचे वाकोला नदीला मिळणारे मुख, एअर इंडिया जवळच्या नाल्याचे मिठी नदीला मिळणारे मुख, विद्यानगरी मेट्रो स्थानकाजवळील पर्जन्य जलवाहिनीचे वाकोला नदीला मिळणारे मुख, क्रिकेटर संदीप पाटील यांच्या भूखंडाजवळच्या नाल्याचे वाकोला नदीला मिळणारे मुख आणि कनाकिया इमारतीसमोरील ब्रह्मानंद शिंदे यांच्या भूखंडाजवळ वाहणाऱ्या नाल्याचे वाकोला नदीला मिळणारे मुख येथे पूरनियंत्रक दरवाजे बांधले जाणार आहेत.