Join us

मार्क कमी मिळाल्याने शाळेतून बेपत्ता झालेल्या पाच मुलींनी घालविली चर्चमध्ये रात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 5:51 AM

जवळपास दीड दिवसापासून बेपत्ता असलेल्या पाचही शाळकरी मुली अखेर सापडल्या आहेत. शाळेतील सत्र परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने पालकांच्या भीतीपोटी कोणालाही न सांगता शुक्रवार दुपारपासून निघून गेलेल्या पाचपैकी चार विद्यार्थिनींचा २६ तासांनी शोध लागला.

मुंबई : जवळपास दीड दिवसापासून बेपत्ता असलेल्या पाचही शाळकरी मुली अखेर सापडल्या आहेत. शाळेतील सत्र परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने पालकांच्या भीतीपोटी कोणालाही न सांगता शुक्रवार दुपारपासून निघून गेलेल्या पाचपैकी चार विद्यार्थिनींचा २६ तासांनी शोध लागला. तर अन्य एक मुलगी रात्री नऊच्या सुमारास स्वत:हून घरी पोहोचली. पालक, शिक्षक, नातेवाईक व मित्रमंडळींना न कळविता बेपत्ता झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या गणवेषातच त्या मुंबई, ठाण्यातील काही परिसरात भटकत होत्या. शुक्रवारची रात्र त्यांनी माहिम परिसरातील चर्चमध्ये काढली.पाचही मुली कुलाब्यातील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूलमधील आठवीच्या वर्गातील असून शुक्रवारी त्यांचे ‘ओपन हाउस’ होते. एका विषयामध्ये त्या नापास झाल्याने त्यांचे पालक नाराज होते. ते निघून गेल्यानंतर पालकांकडून बोलणी खावी लागतील या भीतीपोटी शाळा सुटल्यानंतर त्यांनी घरी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी अडीचच्या सुमारास त्या एकत्रित बाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत मुली घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध करून पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर आयुक्त प्रवीण पडवळ यांनी तपासासाठी विविध पथके बनविली. मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध सुरू होती. हँगिंग गार्डनच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पाचही जणी एकत्रित बाहेर पडत असल्याचे आढळले. मात्र एकीकडेही मोबाइल नसल्याने त्यांचे ‘लोकेशन ट्रेस’ करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांचे फोटो दाखवून शोधमोहीम राबविली जात होती. शनिवारी साडेचारच्या सुमारास चार विद्यार्थिनींपैकी एका मुलीच्या नातेवाइकाला त्या कुर्ला परिसरात फिरत असल्याचे दिसले. त्याने त्यांना थांबवित कफ परेड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलला कळविले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.शाळेतून बाहेर पडल्यानंतर पाचही मुलींनी टॅक्सी व लोकलने प्रवास करीत मरीन लाइन्स, हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केला. स्वत:कडे असलेल्या पैशातून त्यांनी दुपारी व रात्री जेवण केले होते. शनिवारी त्यातील एक मुलगी तिच्या परिचितासोबत गेल्याचे तिच्या मैत्रिणींनी सांगितले. दुपारी चौघी जणी कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्या. रात्री नऊच्या सुमारास पाचवी मुलगी घरी आल्याचे तिच्या पालकांकडून सांगण्यात आले.- प्रवीण पडवळ, अपर आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग

टॅग्स :विद्यार्थीमुंबई