४ गटांसह पाच गणांत होणार निवडणूक
By admin | Published: January 20, 2015 12:06 AM2015-01-20T00:06:03+5:302015-01-20T00:06:03+5:30
ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ४२ गटासाठी २८९ अर्ज दाखल केले असता त्यापैकी २७५ जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे उर्वरित चार उमेदवार बिनविरोध निवडून आले
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी ४२ गटासाठी २८९ अर्ज दाखल केले असता त्यापैकी २७५ जणांनी अर्ज मागे घेतले. यामुळे उर्वरित चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून चार गटांमध्ये निवडणुका होणार आहेत. तर पंचायत समितीच्या ४७० जणांपैकी ३९५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित सहा जणांची बिनविरोध निवड झाली असून पाच गणांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे.
नगरपालिका, नगरपंचायती करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या ६७० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकला आहे. यामुळे राजकीय पक्षांऐवजी अपक्ष उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या चार जागांसह पंचायत समित्यांच्या चार जागी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
चार ठिकाणी एकाच उमेदवारांचा अर्ज शिल्लक राहिल्यामुळे त्याची बिनविरोध निवड झाली आहे. याममध्ये जिल्हा परिषदेच्या चार जणांसह पंचायत समित्यांच्या चार गणात उरलेले उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
मुरबाड तालुक्यातील शिरवली व नारिवली गटात निवडणूक होणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर याच तालुक्यातील पंचायत समितीच्या टोकावडे, शिवळे आणि देवगांव या गणांमध्ये निवडणुका होणार आहेत.
शिवळे गणांत तीन उमेदवार शिल्लक असून उर्वरित टोकावडे व देवगांव गणांमध्ये प्रत्येकी दोन प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील आसनगांव व नडगांव या गटांमध्ये निवडणूक होणार असून येथे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय या तालुक्याच्या कळंबे व शिरोळ या गणांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेऊन केवळ एक उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील सरळगांव, भिवंडी तालुक्यातील महापोली, मोहंडळ तर अंबरनाथ तालुक्यातील चरगांव गटांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय पंचायत समिती गणांमध्ये एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे तो उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. यामध्ये सोनावळे, आसोळे, मुरबाड, म्हसा, नारिवली या मुरबाड तालुक्यातील गणांमधील उमेदवारांसह भिवंडी तालुक्यातील भादाणे या गणांमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या २७५ उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन निवडणुकीवरील बहिष्कार टाकला आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ८५ उमेदवारांसह मुरबाड तालुक्यातील ५५, भिवंडी -१ मधील ६२, भिवंडी -२ मधील ५९, अंबरनाथमधील १३ आदी जि. प. च्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. याशिवाय पंचायत समित्यांच्या गणांसाठी जिल्हाभरातून सुमारे ३९५ उमेदवारानी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये शहापूर पंचायत समितीच्या १३२ उमेदवारांसह मुरबाडच्या १०६, भिवंडी-१च्या ५९, भिवंडी- २च्या सर्वच्या सर्व म्हणजे ५९ तर अंबरनाथच्या सुमारे २७ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. (प्रतिनिधी)
या बहिष्काराचा विचार करून राज्य शासनाने पात्र ग्राम पंचायतींच्या नगरपालिका व नगरपंचायती तत्काळ घोषीत कराव्यात. त्यानंतरच गट गणांची रचना करून निवडणूक घेणे आवश्यक आहेत. जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. ते देखील नंतर राजीनामे देणार आहेत. तर निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवारांच्या विजयानंतरही जि. प. व पंचायत समित्या अस्तित्वात येणार नाहीत.
- दशरथ तिवरे,
राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष
४जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांविरु द्ध बहिष्काराचे शस्त्र उगारलेल्या राजकीय पक्षांच्या धोरणाला शहापूरमध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षांनी छेद दिल्याने ३ जि.प. गटांत व १ पं.स. गणात निवडणूक होणे अटळ आहे.
४वैध ९७ अर्जांपैकी जि.प.च्या नडगाव गटात श्याम म्हस्कर, कमलाकर जाधव, वासिंद गटात विकी जाधव, संजय सुरळके, आसनगाव गटात पुंडलिक भोईर, प्रसाद पाटील, नंदकुमार मोगरे यांनी तर पं.स.च्या १३५ वैध अर्जांपैकी कळंभे गणात अपक्ष संजय भोईर, जयराम चंदे यांनी आयत्या वेळी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अटळ झाली आहे.
४तालुका नेत्यांच्या बहिष्काराच्या रणनीतीला छेद बसला आहे. अपक्षांनी अर्ज मागे न घेऊन राजकीय नेत्यांना आव्हान दिल्याने उर्वरित उमेदवाराला सर्वपक्षीय मदत करून त्या-त्या गण, गटांत जिंकून आणण्याचा चंग बांधला आहे.