Join us

लोअर परळ स्टेशनवर आज रात्री जाऊ नका; रेल्वेचा रात्री ११:३० ते पहाटे ४:३० ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 06:40 IST

मुंबई सेंट्रल ते माहीम स्टेशनदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकात दोन्ही जलद मार्गिकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शनिवारी रात्री ११:३० ते ४:३० दरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते माहीम स्टेशनदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. 

लोकलच्या परिचालनासाठी संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम बसविण्यात येत असल्याने पॉईंट फेल्युअर, सिग्नलिंग यंत्रणेतील बिघाड, उपकरणांची वारंवार करावी लागणारी देखभाल-दुरुस्ती इत्यादी घटनांचे प्रमाण कमी होईल. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी सिस्टम महत्त्वपूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्वी रेल्वेचे ट्रॅक बदलण्यासाठी ट्रॅकवर थांबून कर्मचारी लोखंडी लिव्हरची मदत घेत असत. त्यानंतर इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग सिस्टम आली. नंतर बटणांद्वारे हे काम होऊ लागले. आता इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमचा वापर सुरू झाला आहे. या यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कॉम्प्युटरवर प्रोग्रॅमद्वारे गाड्यांचे परिचालन करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांची तंगडतोड 

शुक्रवारी रात्री ११:२५ नंतर महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्टेशनवरून विरार आणि बोरिवलीसाठी प्रवाशांना लोकल उपलब्ध झाल्या नव्हत्या. परिणामी सेकंड शिफ्ट करून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यांना लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि दादर स्टेशनवर जावे लागले. 

टॅग्स :लोअर परेलपश्चिम रेल्वे