Mumbai Coastal Road: राखीव निधी संपला, ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत; कोस्टल रोडसाठी विशेष निधीतून उचलणार 500 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 05:07 PM2022-01-03T17:07:58+5:302022-01-03T17:08:25+5:30

Mumbai Coastal Road Project:सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पासाठी महापालिकेने सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वेग देण्यासाठी प्रशासनही प्रयत्नशील आहे.

Five hundred crore to be raised from special fund for mumbai Coastal Road project | Mumbai Coastal Road: राखीव निधी संपला, ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत; कोस्टल रोडसाठी विशेष निधीतून उचलणार 500 कोटी...

Mumbai Coastal Road: राखीव निधी संपला, ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत; कोस्टल रोडसाठी विशेष निधीतून उचलणार 500 कोटी...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई - सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पासाठी महापालिकेने सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला वेग देण्यासाठी प्रशासनही प्रयत्नशील आहे. मात्र सध्या राखीव निधी खर्च झाला असल्याने ठेकेदार आणि सल्लागाराला मानधन देण्यासाठी पैसे शिल्लक नाही. यासाठी पाचशे कोटी रुपये विशेष निधीतून उचलण्यात येणार आहे. 

मुंबईकरांचा शहर ते पश्चिम उपनगर प्रवास सुसाट व वेगवान करणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा हा मार्ग आहे. कोविड काळात हा प्रकल्प रखडला होता, मात्र मनुष्यबळ व नियमित निधी उपलब्ध करून हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरु आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. यासाठी सागरी मार्ग प्रकल्पाकरिता भरीव तरतूदही केली जात आहे. 

या प्रकल्पासाठी तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपये अपेक्षित आहे. देशातील पहिल्या सागरी किनाराच्या कामासाठी पालिकेने विद्यमान अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद केली होती. यापैकी आतापर्यंत एक हजार ९९६ कोटी रुपये खर्च केले आहेत. कामाअंतर्गत ठेकेदार, सल्लागार आणि साधारण सल्लागार यांना त्यांचा कामाचा मोबदला जानेवारी २०२२ पर्यंत देण्यासाठी पाचशे कोटींची आवश्यकता आहे. ही रक्कम विशेष निधीमधून (पायाभूत सुविधा विकास निधी) उचलण्यात येणार आहे.

महाकाय बोगदे प्रगतीपथावर...    
या प्रकल्पांतर्गत मलबार हिल, गिरगाव चौपाटीखालून चार किलोमिटरहून अधिक लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिल्या बोगद्याचे काम प्रियदर्शनी पार्क येथून सुरु होऊन दोन कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरीत ७० मीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू होणार आहे. या दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्‍येकी २.०७० किलोमिटर असून व्यास १२.१९ मीटर आहे.

परवानगीच्या प्रतीक्षेत...
विशेष निधी अंतर्गत जमा होणारी रक्कम ही मुंबई शहरातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्प कामासाठी वापरण्यात येते. कोस्टल रोड आणि गोरेगाव -  मुलुंड जोड रस्ता या प्रकल्पाचा खर्च विशेष निधीतून केले जाणार आहे. त्यामुळे पाचशे कोटी रुपये विशेष निधीतून उचलण्याची मंजुरी मिळण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. 

Web Title: Five hundred crore to be raised from special fund for mumbai Coastal Road project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.