पाचशे रुपयांचे तिकीट दिले ५ हजार ५०० रुपयांना; फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 02:12 AM2020-02-03T02:12:03+5:302020-02-03T06:28:15+5:30
आरक्षित तिकीट देतो, असे सांगून लुबाडले
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे आरक्षित तिकीट देतो, असे सांगून तब्बल ५ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणारा तिकीट दलाल संजयकुमार दुबे याला रेल्वे पोलिसांनीअटक केली़ लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे सामान्य डब्याचे तिकीट ५५५ रुपयांना आहे. मात्र हे तिकीट प्रवाशाला ५ हजार ५०० रुपयांना दिले.
प्रवासी मोहम्मद शरीफ याला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुवाहाटीला कामानिमित्त तत्काळ जायचे होते. यासाठी मोहम्मद तिकीटघराकडे जाण्यासाठी निघाला. मात्र दलाल दुबे मोहम्मदकडे जाऊन कुठे जायचे आहे, आरक्षित तिकीट आहे का, असे विचारू लागला. या वेळी मोहम्मद म्हणाला की, तिकीट काढण्यासाठी जात आहे. या वेळी दलाल म्हणाला, आरक्षित तिकीट काढून देतो. तिकिटाचे १ हजार २०० रुपये आणि ५०० रुपये जास्त लागतील, असे सांगितले. मोहम्मदने १ हजार ५०० रुपये देऊन उर्वरित २०० रुपये नंतर देईन, असे सांगितले.
दलाल काही वेळ तेथून नाहीसा झाला. काही वेळाने येऊन रेल्वेचा आरक्षित फॉर्म भरून ओळखपत्र घेतले. मात्र या वेळी दलाल म्हणाला की, एसी डब्याचे तिकीट मिळत आहे, त्यामुळे आणखी २ हजार रुपये लागतील. काही वेळाने पुन्हा नाहीसा झाला. पुन्हा येऊन १ हजार रुपये जास्त लागणार आहेत, असे सांगू लागला. या वेळी मोहम्मदने १ हजार रुपये देऊन त्याचे तिकीट आणून दिले. संबंधित दलालाने सांगितले की, तिकीट इथे बघू नका, बाहेर जाऊन बघा, असे सांगून आणखी १ हजार रुपयांची मागणी केली. मोहम्मदने आणखी १ हजार रुपये देऊन एकूण ५ हजार ५०० रुपये त्याला दिले.
मोहम्मदला तिकीटघराबाहेर येऊन तिकीट बघितल्यावर कळले की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते खंडावापर्यंतचे ८०५ रुपयांचे तृतीय श्रेणीचे तिकीट आहे. मोहम्मदने दलालाकडे जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे तिकीट मागितले. तेव्हा दलालाने काही वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दलालाने दिले. ५ हजार ५०० रुपयांमध्ये ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दिले. त्यामुळे मोहम्मदला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मोहम्मदने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मोहम्मदसह पोलीस तिकीटघराकडे गेले असता, दलाल संजयकुमार दुबेला पोलिसांनीअटक केली़
सामान्य डब्याचे दिले तिकीट
मोहम्मदला तिकीटघराबाहेर येऊन तिकीट बघितल्यावर कळले की, लोकमान्य टिळक टर्मिनस ते खंडावापर्यंतचे ८०५ रुपयांचे तृतीय श्रेणीचे तिकीट आहे. मोहम्मदने दलालाकडे जाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटीचे तिकीट मागितले. तेव्हा दलालाने काही वेळ थांबण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दलालाने दिले.५ हजार ५०० रुपयांमध्ये ५५५ रुपयांचे सामान्य डब्याचे तिकीट दिले. त्यामुळे मोहम्मदला आपली फसवणूक झाल्याचे समजले. मोहम्मदनेपोलिसांत तक्रार दाखल केली.