पाचशे रुपयेही गेले खड्ड्यात; तक्रारदारांना अद्याप पैसे नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:19 AM2019-11-07T02:19:46+5:302019-11-07T02:19:55+5:30

योजनेचा आज शेवटचा दिवस : सहा दिवसांत ८५ जण बक्षिसाचे मानकरी

Five hundred rupees went into the pit; Complainants still have no money | पाचशे रुपयेही गेले खड्ड्यात; तक्रारदारांना अद्याप पैसे नाहीच

पाचशे रुपयेही गेले खड्ड्यात; तक्रारदारांना अद्याप पैसे नाहीच

googlenewsNext

मुंबई : ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा!’ योजनेप्रमाणे २४ तासांत न बुजविलेल्या खड्ड्यांसाठी तक्रारदारांना बक्षीस मिळणार होते. अधिकाऱ्यांच्या खिशातून ही रक्कम देण्यात येईल, अशी घोषणाही प्रशासनाने केली. या योजनेअंतर्गत पाचशे रुपयांचे मानकरी ठरलेल्या ८५ तक्रारदारांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. याबाबत स्थायी समिती सदस्यांनी फैलावर घेतल्यानंतरही प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. आज या योजनेचा शेवटचा दिवस आहे.

मुंबईतील खड्ड्यांची नोंद होऊन ते तत्काळ बुजविले जावेत, यासाठी पालिका प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून ही योजना सुरू केली. पालिकेचे संकेतस्थळ, अ‍ॅप व हेल्पलाइनच्या माध्यमातून मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी घेण्यात आल्या. या सहा दिवसांमध्ये आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९१ टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र ८५ खड्डे २४ तासांनंतर बुजविण्यात आल्यामुळे योजनेनुसार संबंधित तक्रारदारांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे बक्षीस मिळणे अपेक्षित होते. मात्र अद्याप एकाही तक्रारदाराला हे बक्षीस मिळालेले नाही. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी प्रशासनाला जबाबदार धरले. अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते संजय दराडे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला फैलावर घेतले.

उद्या शेवटचा दिवस...
१ नोव्हेंबर रोजी सुरू केलेल्या या योजनेचे तीव्र पडसाद उमटले. पालिकेकडे खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस होऊ लागला. दंड टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र खड्डे बुजविण्याचा वेग चौथ्या दिवशी कमी झाला. ही योजना एका आठवड्यासाठी असल्याने उद्या या योजनेचा शेवटचा दिवस असणार आहे.
वाहतूक अधिकारी साधणार संपर्क
अ‍ॅपवर आलेल्या १,६७० खड्ड्यांच्या तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीबाबत खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या वाहतूक विभागातील चार अधिकारी नेमणार असल्याचे पालिका अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

च्१ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत १,६७० खड्ड्यांबाबतच्या तक्रारी पालिकेला विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या.
च्यापैकी १,५५१ म्हणजेच ९१ टक्के तक्रारींचे निवारण २४ तासांमध्ये करण्यात आले.
च्टोल फ्री क्रमांक १८००२२१२९३, पालिका तक्रार निवारण क्र. १९१६, पालिकेचे पोर्टल, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि सोशल मीडियावर खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविता येतात.

खड्ड्यांच्या बाबतीत प्रशासनाचे ‘सांगकाम्या’ धोरण

मुंबई : खड्डे दाखवा आणि चोवीस तासांत तो न बुजविल्यास पाचशे रुपये मिळवा, ही नवी शक्कल महापालिकेने लढविली आहे. पालिका ‘सांगकाम्या’ धोरण अवलंबत असल्याचे दिसून येत आहे़ निव्वळ तक्रार आलेलाच खड्डा बुजवून आसपासच्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे तूर्त चित्र आहे.
‘खड्डे दाखवा आणि पैसे मिळवा’ या पालिकेच्या उपक्रमाला मुंबईकरांकडून प्रतिसाद मिळत आहे. ‘माय बीएमसी पोटहोल फिक्सिट’ या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेला मिळत आहेत. अ‍ॅपवर रजिस्टर केलेला खड्डा न बुजविता भलत्याच खड्ड्याला बुजवून त्यांचे फोटो तक्रारदाराला पाठविण्यात येत आहेत. याबाबत विचारणा केल्यास खड्ड्याची लोकेशन नीट समजली नाही, अशी उत्तरे देण्यात येत आहेत. तक्रार करण्यात आलेला खड्डा बुजविताना बºयाचदा त्याच्या आसपासही मोठमोठे खड्डे असतात. त्याची निव्वळ तक्रार नाही, म्हणून पालिका कर्मचारी कानाडोळा करतात. मालाड, कांदिवली, गोरेगाव परिसरात असे प्रकार उघडकीस आले आहेत. ‘मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात आमदार विद्या ठाकुर यांच्या कार्यालयासमोर असलेला खड्डा अ‍ॅपवर तक्रार दाखल केल्यावर पालिकेच्या पी दक्षिण विभागाने बुजविला. त्याच्या शेजारी सहा ते सात मोठमोठे खड्डे पडले आहे. सिग्नल परिसरात अपघात होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. सोमवार बाजार परिसरातही अशाच प्रकारे मोठमोठे खड्डे पडले असून, त्यावरही दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिक मनीषा लुडबे यांचे म्हणणे आहे. रस्त्यावर एकही खड्डा राहू न देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिक त्यांना मदत करत आहेत. मात्र, पालिकेकडून सांगकाम्याची भूमिका घेतली जात असून, याबाबतही आवश्यक पावले वरिष्ठांनी उचलावी, असे स्थानिक यशोदा रेवंडीकर यांचे म्हणणे आहे.

Web Title: Five hundred rupees went into the pit; Complainants still have no money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.