पाच बेकायदा इमारती पाडल्या
By admin | Published: April 14, 2017 03:48 AM2017-04-14T03:48:55+5:302017-04-14T03:48:55+5:30
आयुक्त अजय मेहता यांच्याकडून दट्ट्या पडल्यानंतर सर्व सहायक आयुक्तांनी बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार वर्सोवा येथील गावठाण परिसरात
मुंबई : आयुक्त अजय मेहता यांच्याकडून दट्ट्या पडल्यानंतर सर्व सहायक आयुक्तांनी बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम उघडली आहे. त्यानुसार वर्सोवा येथील गावठाण परिसरात तब्बल पाच बेकायदा इमारती पाडण्यात आल्या. यामध्ये व्यावसायिक बांधकामांचाही समावेश आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.
अंधेरी येथील वर्सोवा गावठाणामध्ये वर्सोवा जेट्टीजवळील तीन हजार चौरस फुटांच्या जागेवर तीन मजली बेकायदा बांधकाम उभे करण्यात आले होते. त्याचबरोबर खाडी परिसरालगतच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या साडेआठ हजार चौरस फूट जागेवर चार ठिकाणी बेकायदा बांधकामे सुरू होती.
तर जोगेश्वरी पश्चिम परिसरात स्वामी विवेकानंद मार्गाचा उपमार्ग असणाऱ्या बांदिवली हिल रस्त्याजवळील रेहान टॉवर या इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेली सदनिका तोडण्यात आली. त्याचबरोबर कॅप्टन सुरेश सामंत मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करून हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
रस्ता झाला मोकळा
एस.व्ही. रोडच्या बाजूला कॅप्टन सुरेश सामंत मार्ग आहे. हा मार्ग एस. व्ही. मार्गाला जिथे जोडला जातो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती. यामध्ये आठ पक्क्या स्वरूपाच्या आणि १२ कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांचा समावेश होता.
या अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. ज्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी होण्यासोबतच पादचाऱ्यांनाही चालताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अतिक्रमणे हटविल्यानंतर मोकळ्या झालेल्या रस्त्यावर महापालिकेच्या रस्ते खात्याद्वारे रस्ता, पदपथ आदी सुविधा तयार करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे.