अंधेरीत बांधकाम कोसळून पाचजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:02+5:302021-07-29T04:07:02+5:30
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्लीतील मेहता बाबा चाळ परिसरातील तळमजला अधिक तीन मजली असे सुरू असलेले बांधकाम लगतच्या ...
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्लीतील मेहता बाबा चाळ परिसरातील तळमजला अधिक तीन मजली असे सुरू असलेले बांधकाम लगतच्या सहा घरांवर कोसळून पाचजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
अकबर शेख, चांद शेख, आजर शेख, आरिफ शेख आणि शमशुद्दीन शेख अशी या दुर्घटनेतील पाच जखमींची नावे असून, त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे घटनास्थळी कोसळलेला राडारोडा उचलण्यासाठी आणि मदतकार्य करण्याकरिता मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तत्काळ दाखल झाले होते. या व्यतिरिक्त अग्निशमन दलाचे चार फायर इंजिन आणि मुंबई महापालिकेचे ७५ कामगार घटनास्थळी मदतकार्यासाठी रवाना करण्यात आले होते. बुधवारी दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळावरील ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.