स्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 06:22 PM2020-05-29T18:22:25+5:302020-05-29T18:22:54+5:30
सामाजिक, आर्थिक दुर्बल व्यक्ती यांना प्रति महिना व प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला.
मुंबई : स्थलांतरीत मजूर, शिधापत्रिका नसलेल्या व्यक्ती अन्न, धान्याची गरज असलेले सामाजिक, आर्थिक दुर्बल व्यक्ती यांना प्रति महिना व प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटप करण्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. सध्या सुमारे सव्वा लाख जणांना हे विनामूल्य तांदूळ देण्यात येणार आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी एक व्यक्ती तर काही ठिकाणी कुटुंब प्रमुख अशांचा समावेश आहे
मे व जून या दोन महिन्यांसाठी प्रति माह, प्रति व्यक्ती पाच किलो विनामूल्य तांदूळ वाटप करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु झाल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलाश पगारे यांनी दिली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व राज्य सरकार च्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांसाठी ही योजना राबवली जात आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,पोलिस व कामगार विभागाच्या मदतीने यासाठी पात्र असलेल्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
कोणतीही व्यक्ती अन्न धान्या शिवाय राहू नयेत या सरकारी धोरणानुसार ही योजना राबवण्यात येत आहे. धान्याचा पुरेसा व मुबलक साठा असल्याने गरजूंनी विनाकारण गर्दी करु नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन दुकानातुन विनामूल्य धान्य घ्यावे असे आवाहन कैलास पगारे यांनी केले आहे.