Join us

वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू; निर्माणाधीन इमारतीतील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 8:08 AM

मुंबईत लिफ्ट कोसळण्याच्या दुर्घटनांत सातत्याने वाढ होत असून, लिफ्टची देखभाल दुरुस्ती रखडणे हे यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे.

मुंबई : वरळी येथील हनुमान गल्लीतील अंबिका बिल्डर्स या बांधकाम साइटवर शनिवारी बांधकामाची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. अविनाश दास (३५), भारत मंडल (२८), चिन्मय मंडल (३३) अशी या दुर्घटनेतील तीन मृतांची नावे असून, दोन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. एका जखमीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत लिफ्ट कोसळण्याच्या दुर्घटनांत सातत्याने वाढ होत असून, लिफ्टची देखभाल दुरुस्ती रखडणे हे यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक ११८ आणि ११९ च्या विरुद्ध बाजूस असलेल्या शंकरराव पदपथ मार्गावरील अंबिका बिल्डर्स येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले. स्थानिकांनीही मदत करण्यासाठी धाव घेतली.  स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, लिफ्टमध्ये एकूण सहा जण होते. यातील दोन जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सहावी व्यक्ती बेपत्ता अपघात झालेल्या लिफ्टमध्ये एकूण सहा जण होते. मात्र सहावी व्यक्ती अपघातानंतर बेपत्ता झाली.  त्या व्यक्तीला कुठल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले याचा शोध घेतला जात आहे. या व्यक्तीबद्दल ठोस माहिती महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडूनही मिळू शकली नाही.