मुंबई-पुणे मार्गावर दरडींचा धोका टाळण्यासाठी पाच किमीचा बोगदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:04 AM2019-08-16T05:04:40+5:302019-08-16T05:05:09+5:30
मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे.
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका अधिक असून येथे दरड कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन मंकी हिल ते ठाकूरवाडी येथे ४ ते ५ किमीचा बोगदा बनविण्याचा विचार करत आहे. रेल्वे मार्गावर खडक, माती कोसळून रेल्वे रुळाचे नुकसान होते. हे नुकसान बोगदा तयार केल्याने कमी होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे प्रशासन आणि रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड्स आॅर्गनायझेशनचे सहकार्य यासाठी घेण्यात येईल. मुंबई ते पुणे मार्गावरील मंकी हिल ते ठाकूरवाडी या ४ ते ५ किमीच्या भागात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. या ठिकाणी एका बाजूला रेल्वे मार्ग आणि दुसºया बाजूला डोंगराळ भाग असल्याने येथून सतत खडक आणि माती कोसळत असते. त्यामुळे येथे बोगदा तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, दरड कोसळण्याच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दरड कोसळणाºया ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात विचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर येथे बोगदा बनविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोट्यवधींचे नुकसान
इतिहासात प्रथमच मुसळधार पावसामुळे तसेच दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता १३ दिवसांपासून रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. यामुळे रेल्वेला कोट्यवधींच्या महसुलाला मुकावे लागले आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात ९ हजार ११ लोकल तर, ९२३ मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने १३ कोटी २८ लाख ७९ हजार रुपये प्रवाशांना परतावा केला आहे.
आज एका दिवसासाठी मुंबई-पुणे रेल्वे मार्ग खुला
मुंबई : मुंबई ते पुणे मार्गावरील मेल, एक्स्प्रेस १६ आॅगस्टला सुरू करण्यात येईल. इतिहासात प्रथमच १३ दिवस मुंबई ते पुणे मार्ग ठप्प झाला होता. १६ आॅगस्ट रोजी या मार्गावरून १२ मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येतील. मात्र त्यानंतर १७ आणि १८ आॅगस्टला मुंबई-पुणे मेल, एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांना एकच दिवस मुंबई ते पुणे मेल, एक्स्प्रेसने प्रवास करता येईल.
१६ आॅगस्ट रोजी पुण्याहून मुंबईला जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
१७, १८ आॅगस्ट रोजी मुंबई-चेन्नई, मुंबई-पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, बिदर-मुंबई-बिदर, सोलापूर-मुंबई-सोलापूर, नांदेड-पनवेल, हुबळी-एलटीटी अशा २० मेल, एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. तर, अनेकांच्या मार्गात बदल केला आहे.