Join us

हापूसच्या पाच डझनाच्या पेटीला लाखाचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणातील दहा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटीचा लिलाव शुक्रवारी मुंबईत झाला. त्यात राजापूरमधील बाबू अवसरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोकणातील दहा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटीचा लिलाव शुक्रवारी मुंबईत झाला. त्यात राजापूरमधील बाबू अवसरे यांच्या पाच डझन हापूस आंब्याच्या पेटीला घसघशीत एक लाख रुपयाचा भाव मिळाला आहे.

हापूसची पहिली पेटी उद्योजक राजेश अथायडे यांनी एक लाख आठ हजार रुपये अशी घसघशीत किंमत देऊन घेतली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चार शेतकऱ्यांच्या मुहूर्ताच्या पेट्या प्रत्येकी २५ हजार रुपये दर देऊन विकत घेतल्या. लिलावात एकूण तीन लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपयेप्रमाणे ही रक्कम समप्रमाणात दिली जाणार आहे. देवगड सौंदळमधील नाना गोखले, राजापूर पडवेमधील बाबू अवसरे, कुंभवडेमधील पंढरीनाथ आंबेरकर, शिरसेमधील संजय शिर्सेकर, वाडा तिवरेमधील जयवंत वेल्ये, रत्नागिरीमधील गौरव सुर्वे, उमंग साळवी, दीपक चव्हाण, तुषार साप्ते, शेखर दळवी असे एकूण दहा शेतकरी लिलावात सहभागी झाले.

हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ग्लोबल कोकण आणि मायको या मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. या माध्यमातून विजयदुर्ग, राजापूर, देवगड, रत्नागिरी आणि कोकणच्या इतर भागातील सर्वोत्कृष्ट दर्जाचा आणि कोणतीही भेसळ नसलेला आंबा जगभरातील ग्राहकांना मिळेल, असे ग्लोबल कोकणचे संचालक संजय यादवराव म्हणाले.