Join us

पाच लाख प्रवासी कमी झाले, तरीही ऑफिसच्या वेळा बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:34 AM

प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा दाेन्हींचा भार मध्य रेल्वेला सहन हाेईना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मध्य रेल्वेवर सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या गर्दीवर उतारा म्हणून खासगी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे. मात्र, कोरोनापूर्व काळात रोज ४२ लाख प्रवासी संख्या असलेल्या मध्य रेल्वेवर आता रोज ३७ लाख लोक प्रवास करत आहेत. रोजची सुमारे पाच लाखांची प्रवासी संख्या कमी झालेली असतानाही सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर एकीकडे फारसे काम होताना दिसत नाही. मात्र, दुसरीकडे रेल्वे शहाजोगपणे इतरांना कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा सल्ला देत आहे.

वास्तविक मध्य रेल्वे मार्गावर वेळेवर न धावणाऱ्या लोकलमुळे पुढच्या लोकलचे प्रवासी प्लॅटफार्मवर येतात, त्यामुळे सकाळी गर्दीचा उच्चांक होतो. त्यातच गाड्या रद्द होणे, तांत्रिक बिघाड, पायाभूत सुविधा नसणे, पोलिसांचा अपुरा बंदोबस्त यामुळे गोंधळात भरच पडते. मध्य रेल्वेला गर्दी झेपत नसल्याने त्याचे खासगी कार्यालयांवर खापर फोडले जात आहे. बहुतांश कार्यालये सीएसएमटी परिसरात आहेत. मध्य रेल्वे मार्गावर दररोज १,८१० लोकल फेऱ्या होतात. यामध्ये एका गाडीत १,२०० प्रवाशांची आसनव्यवस्था आहे; परंतु, गर्दीच्या वेळी ही संख्या तीन ते चार हजार होते. मध्य रेल्वेवर रोज ३७ लाखांहून अधिक जण प्रवास करतात. 

सर्वाधिक प्रवासी सीएसएमटी स्थानकातील आहेत. त्यानंतर ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, कुर्ला, पनवेल आणि दादर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होते. मध्य रेल्वेवर गाड्यांना होणारा उशीर, गाड्या रद्द होणे, सिग्नलसह इतर तांत्रिक बिघाड, पायाभूत सुविधांचा अभाव ही गर्दी वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. मात्र, त्यावर रेल्वेकडून अपेक्षित उपाययोजना होताना दिसत नाही. 

रेल्वेला गर्दी व्यवस्थापन जमत नसल्याने कार्यालयीन वेळा बदलण्याचा खटाटोप सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.  दोन गाड्यांच्या वेळेत बदल झाला तरी प्लॅटफॉर्म भरतो पण त्याची जबाबदारी घेऊन उपाययोजना करण्याऐवजी रेल्वे इतर कार्यालयांना सल्ले देत आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वेवर एकूण २९२ प्लॅटफॉर्म आहेत. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक ते दोन जवान तैनात असतात. तसेच आवश्यक असल्यास एमएसएफ जवान आणि  होमगार्डची मदत घेतली जाते. एखाद्या स्थानकात गर्दी झाल्यास टप्प्याटप्प्याने प्रवाशांना सोडले जाते.- मनोज पाटील, उपायुक्त, लोहमार्ग पोलिस

गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची रुंदी वाढविणे, स्टॉल कमी करणे, आरपीएफ जवान तैनात करणे उपाययोजना केल्या जात आहेत. कार्यालयांनी वेळेत बदल केल्यास गर्दीमुक्त प्रवास करता येईल.- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने वक्तशीरपणा, तांत्रिक बिघाड याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गर्दी नियोजनासाठी उपाययोजना केल्या जातात पण रेल्वेकडून प्रकल्पांची कामे वेळेत हाेत नसल्याने गर्दीचा प्रश्न उभा राहतो.        - नंदकुमार देशमुख,     अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

गर्दीची स्थानके    सीएसएमटी    दादर    कुर्ला    ठाणे    डोंबिवली    कल्याण

टॅग्स :मुंबईलोकल