Join us

पाच लाख भाविकांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 1:08 AM

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात मंगळवारी सुमारे पाच लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

मुंबई : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात मंगळवारी सुमारे पाच लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. भाविकांना सुलभरीत्या श्रींचे दर्शन व्हावे यासाठी न्यासाने उत्तम नियोजन केले होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा होती.श्रींच्या दर्शनासाठी चार रांगांचे नियोजन होते. व्यवस्थापनासाठी न्यासाच्या २५० कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षक तैनात होते. सेवा पुरविण्यासाठी ३५० सेवेकरी आणि अनिरुद्ध बापूंचे २०० स्वयंसेवक काम करीत होते. तसेच सुरक्षेसाठी १५० पोलीस आणि खासगी ४० ते ५० सुरक्षा रक्षक तैनात होते. क्वीक रिस्पॉन्स टीम, आपत्कालीन व्यवस्थापन, अग्निशमन दलाचे दोन फायर इंजीन, चार रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे २० अधिकारी, डॉग स्कॉट आणि बॉम्ब स्कॉट या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात तैनात होत्या. तसेच सहा मोफत बसगाड्या दादर स्थानक ते रवींद्र नाट्यमंदिरापर्यंत चालविण्यात आल्या होत्या. चहा, नाश्ता भाविकांना मोफत देण्याचीही व्यवस्था होती.सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांकडूनही मोफत सेवा पुरविण्यात आल्या. दरम्यान, अडीच ते तीन लाखांपर्यंत लाडू आणि नारळवडीचा प्रसाद न्यासाकडून देण्यात आल्याची माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली.श्रींच्या दर्शनासाठी शिस्तबद्धतेने मंदिराच्या चारही बाजूंनी दर्शनाच्या रांगा लावण्यात आल्या होत्या. दर्शन हे सोमवारच्या मध्यरात्री १.३० वाजता सुरू झाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा आकडा सुमारे ५ लाखांपर्यंत आहे. पोलिसांनी उत्तम कामगिरी केली असून, भाविकांनी योग्य सहकार्य केले आहे.- आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिर