पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी १५ हजारांचे ‘प्रोत्साहन’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:53 AM2023-02-15T08:53:36+5:302023-02-15T09:18:34+5:30

धान उत्पादकांना सरकारचा दिलासा

Five lakh farmers will get 'incentive' of Rs 15,000 per hectare | पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी १५ हजारांचे ‘प्रोत्साहन’

पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी १५ हजारांचे ‘प्रोत्साहन’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. त्यासाठी १ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.

या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर मिळेल . ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल. यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

१,३३,७९,८९२ 
क्विंटल धान खरेदी २०२१-२२ खरीप हंगामात झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. 
या पूर्वी खरीप हंमागात धान उत्पादकांना प्रतिक्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली. मात्र ही रक्कम प्रतिक्विंटल देण्यात येत असल्यामुळे अडचणी येत होत्या. 
ज्यांच्याकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याची तक्रार होती. 

राज्यपाल कोश्यारी यांच्या अभिनंदनाचा ठराव

वादग्रस्त कारकीर्द ठरलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा ठराव मांडला. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करण्यात आले. 

तंत्रज्ञान विद्यापीठ कुलगुरू निवड पद्धतीत सुधारणा
nरायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे येथील महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
nत्यानुसार, या विद्यापीठांच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येईल. त्यानुसार, लोणेरे आणि पुणे येथील तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडपद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे.

विकास आराखड्यांचा आढावा
पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र, तसेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्यांचे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देण्यासाठी सुमारे ७८७ कोटी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वाशिम तालुक्यातील ५ हजार ५५४ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर असे एकूण ७,६९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

Web Title: Five lakh farmers will get 'incentive' of Rs 15,000 per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.